Maharashtra Transport Strike : राज्यातील वाहतूक क्षेत्रात आजपासून (५ मार्च) मोठा पेच निर्माण झाला आहे. ई-चलन प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायकारक दंडवसुलीला विरोध करण्यासाठी विविध वाहतूक संघटनांनी राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने, आता जोपर्यंत ठोस सरकारी निर्णय (GR) मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’ने घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवासावर टांगती तलवार
या संपाचा सर्वात मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची भीती आहे. सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून, मुंबई स्कूल बस असोसिएशनने या संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालकांना आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.
आझाद मैदानावर ‘प्रतीकात्मक’ वाहन सुपूर्द मोहीम
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि पालघरमधून हजारो वाहतूकदार आपली वाहने घेऊन दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाकडे रवाना होणार आहेत. ही वाहने शासनाच्या स्वाधीन करण्याचा प्रतीकात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरणार असल्याने मुंबई महानगरातील प्रमुख महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
वाहतूकदारांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
- ई-चलन प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात.
- एकाच चुकीसाठी वाहनधारकाकडून वारंवार दंड आकारणे थांबवावे.
- शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्था नसताना नो-पार्किंग अंतर्गत होणारी दंडात्मक कारवाई रद्द करावी.
- नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली वसुली थांबवण्यासाठी लेखी आश्वासन द्यावे.
जनजीवनावर होणारे परिणाम
या संपात ट्रक, टेम्पो, खाजगी बस, टॅक्सी आणि रिक्षा यांचाही समावेश असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. रिक्षा-टॅक्सी उपलब्ध नसल्यास ॲप-आधारित कॅब कंपन्यांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोकरदार वर्गालाही सकाळी कामावर जाताना वाहतूक कोंडीचा आणि वाहनांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.











