Ajit Pawar Plane Crash : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अद्यापही शोक आणि संशयाचे वातावरण कायम आहे. या दुर्घटनेभोवती असलेल्या गूढतेबाबत आमदार रोहित पवार यांनी उघडपणे शंका उपस्थित केल्या असून, व्हीएसआर कंपनी आणि नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. या अपघातामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांचे ठाम मत असून, या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अत्यंत महत्त्वाच्या हालचाली पाहायला मिळाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० पेक्षा अधिक आमदारांनी रात्री उशिरा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या बैठकीचा मुख्य रोख नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) सादर केलेल्या तपास अहवालावर होता. संबंधित आमदारांनी या अहवालातील तांत्रिक बाबी आणि निष्कर्षांवर तीव्र आक्षेप नोंदवले असून, त्यात अनेक त्रुटी असल्याचे सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वीच या संपूर्ण प्रकरणाची ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’मार्फत (CBI) उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांशी या विषयावर तातडीने चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांनी सुनेत्रा पवार यांना साकडे घातले. त्यावर, लवकरच सर्व लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.
या बैठकीतील सर्वात भावनिक आणि गंभीर क्षण तो होता, जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपस्थित आमदारांना अपघाताच्या ठिकाणाहून हस्तगत केलेल्या अजित पवार यांच्या वैयक्तिक वस्तू दाखवल्या. यामध्ये त्यांच्या चपला आणि मनगटी घड्याळाचा समावेश होता. या वस्तूंच्या अवस्थेवरून आणि अपघाताच्या स्वरूपावरून आमदारांमध्ये पुन्हा एकदा संशयाची लाट उसळली. सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. या बंद दाराआड झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील अद्याप बाहेर आला नसला तरी, राष्ट्रवादी काँग्रेस आता या अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘देवगिरी’वरील ही खलबते आगामी काळात राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











