Nashik Earthquake : उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढत असतानाच नाशिकच्या सीमावर्ती सुरगाणा तालुक्यात निसर्गाच्या एका वेगळ्याच कोपाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण आणि आसपासच्या परिसरात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका सुरू असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीच्या पोटातून येणारे गूढ आवाज आणि त्यानंतर होणारी थरथराहट यामुळे नागरिकांची रात्रीची झोप उडाली असून, “जमीन हादरतेय आणि काळजात धस्स होतंय,” अशी आर्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
नेमका प्रकार काय? थराराचा घटनाक्रम
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, निवरापाडा, चुली, राशा आणि गोंडाळविहीर यांसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागांत भूगर्भातील या हालचालींचे तीव्र पडसाद उमटत आहेत. ५ मार्चच्या मध्यरात्री ११:५२ वाजता, जेव्हा संपूर्ण परिसर निद्राधीन होता, तेव्हा अचानक जमिनीतून एक भीषण आवाज आला. या धक्क्यामुळे घरांवरील छताचे पत्रे वाजू लागले आणि स्वयंपाकघरातील भांडी जमिनीवर कोसळली. हा अनपेक्षित थरार तिथेच थांबला नाही; ६ मार्च रोजी सकाळी १०:०५ वाजता पुन्हा एकदा जमीन हादरल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली.
गूढ आवाज आणि भिंतींना तडे
राशा गावाजवळील डोंगराळ परिसरातून येणारे विचित्र आवाज हे या धक्क्यांचे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे. स्थानिकांच्या मते, आवाजापाठोपाठ साधारण १ ते २ सेकंद जमीन वेगाने हादरते. सततच्या या धक्क्यांमुळे कच्च्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या चर्चा असून, काही जुन्या बांधकामांना धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्धांमध्ये या नैसर्गिक संकटामुळे असुरक्षिततेची भावना वाढली असून, संपूर्ण तालुक्यात सध्या चिंतेचे आणि तणावाचे सावट आहे.
प्रशासकीय दिरंगाईवर ग्रामस्थांचा संताप
वारंवार होणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामस्थांनी आता प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. डोंगरदऱ्यात वसलेल्या या भागातील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी या परिसरात तातडीने ‘भूकंपमापन यंत्र’ बसवण्यात यावे, अशी आग्रही मागणी उंबरठाण परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून भूगर्भशास्त्रज्ञांच्या मदतीने या गूढ आवाजांचे आणि धक्क्यांचे कारण स्पष्ट करावे, जेणेकरून अफवांना आळा बसेल आणि लोकांच्या मनातील भीती दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












