US-Israel-Iran War : इराणने आता कतार, ओमान आणि इटाली या राष्ट्रांच्या माध्यमातून अमेरिकेशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याला यश यावे अशीच प्रार्थना केली जात आहे. मात्र आमच्यावर असेच हल्ले सुरू ठेवल्यास ही चर्चा बंद करू, असाही इशारा इराणने दिला आहे.
आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र पुन्हा एकदा इराणला डिवचले. इराणने सर्वोच्च पदावर निवडलेले मोजतबा खामेनेई यांची निवड आम्हाला मान्य नसून काही दिवसांत त्यांना हटवू, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प पुढे म्हणाले की, जागतिक सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यासाठी काही काळ तेल भाववाढ सोसावी लागली तर ती फार मोठी किंमत नव्हे. इराणला धडा शिकविल्यावर युद्ध थांबेल तेव्हा तेलाच्या किमती पुन्हा सामान्य होतील. ट्रम्प हे आश्वासन देत असतानाच आज तेलाची प्रति बॅरल किंमत 115 डॉलरवर पोहोचली. यामुळे जी-7 देशाच्या अर्थमंत्र्यांनी इंधन स्थितीवर चर्चा करण्यासाठी ताबडतोब भेटण्याचे ठरविले.
आजही दहाव्या दिवशी इराण व इराकने एकमेकांवर हल्ले सुरू ठेवले. इराणने कुर्दिस्तानच्या अमेरिकी तळावर हल्ला केला. बाहरनीच्या बापको रिफायनरीवर जोरदार ड्रोन हल्ला करून ती उद्ध्वस्त केली. कुवेत शहरावर केलेल्या हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या. तेल अवीव शहरावर पुन्हा हल्ला केला. इराणने आज पुन्हा सांगितले की, शेजारील राष्ट्रांनी आमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांचे तळ उपलब्ध करून दिले नाहीत तर आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार नाही. पण त्यांच्या भूमीवरून आमच्यावर हल्ले केले तर आम्ही त्यांच्यावर हल्ले करून प्रत्युत्तर देऊ.
इस्त्रायलने आजही इराणवर हल्ला सुरूच ठेवला. इराणला आम्ही तीन आठवड्यात शरण आणू, असे इराकने बजावले. आज तेहरान शहरावर हल्ला केल्यानंतर अॅसिड हल्ला झाल्याचा आरोप झाला. इराणची डेना युद्धनौका नष्ट केल्याचा व्हिडिओ अमेरिकेने सकाळी जारी केला.










