Reliance-US Energy Deal: अमेरिकन ऊर्जा क्षेत्राच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच टेक्सासमधील ब्राऊनसव्हिल येथे एका भव्य तेल शुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा केली आहे. तब्बल ५० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर अमेरिकेत असा नवीन प्रकल्प उभा राहणार असून, या ३०० अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक गुंतवणुकीसाठी त्यांनी भारताचे आणि रिलायन्स या आघाडीच्या ऊर्जा कंपनीचे जाहीर आभार मानले आहेत.
प्रकल्पाचे स्वरूप आणि महत्त्व
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या निर्णयाची माहिती दिली. हा प्रकल्प अमेरिकेच्या ऊर्जा उत्पादनाला मोठी चालना देणारा आणि देशाची आर्थिक ताकद वाढवणारा ठरणार आहे.
- ३०० अब्ज डॉलरची गुंतवणूक: हा अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.
- रोजगाराच्या संधी: या प्रकल्पाच्या माध्यमातून दक्षिण टेक्सासमध्ये हजारो नवीन नोकऱ्या निर्माण होतील.
- राष्ट्रीय सुरक्षा: ब्राऊनसव्हिल बंदराजवळील हा प्रकल्प केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण करणार नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेलाही बळकटी देणार आहे.
‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा भाग
राष्ट्राध्यक्षांच्या मते, त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ अजेंड्यामुळेच हे मोठे गुंतवणूक प्रस्ताव अमेरिकेत येत आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मिळवणे सुलभ करणे आणि कर सवलती देणे, यासारख्या धोरणांमुळे गुंतवणूकदार अमेरिकेकडे आकर्षित होत आहेत. ही रिफायनरी जगातील सर्वात स्वच्छ शुद्धीकरण प्रकल्प बनेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर घोषणा
विशेष म्हणजे, ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट निर्माण झाले आहे. अशा अस्थिर परिस्थितीत अमेरिकेचा हा नवा प्रकल्प जागतिक ऊर्जा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या प्रकल्पामुळे जागतिक निर्यातीला मोठी गती मिळेल आणि ज्या भागाला विकासाची गरज आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती होईल, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.












