LPG Crisis : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्याबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि सर्वसामान्य नागरिकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जर तुमच्या परिसरात पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) उपलब्ध असेल, तर सिलिंडरची वाट न पाहता त्वरित पीएनजी कनेक्शन घ्यावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
सिलिंडरवरील ताण कमी करण्यासाठी पीएनजीचा पर्याय
सरकारच्या मते, व्यावसायिक संस्थांनी पीएनजीचा वापर सुरू केल्यास घरगुती वापराच्या सिलिंडरवरील दबाव कमी होईल.
- ज्या हॉटेल किंवा सोसायट्यांमध्ये पीएनजी नेटवर्क आधीच उपलब्ध आहे, त्यांनी एलपीजीऐवजी या पर्यायाला प्राधान्य द्यावे.
- सध्या देशात सुमारे १.५ कोटी पीएनजी कनेक्शन आहेत आणि ६० लाख घरांच्या जवळ हे नेटवर्क पोहोचले आहे, पण अद्याप कनेक्शन घेतलेले नाही.
- गॅस वितरक कंपन्यांना पीएनजी कनेक्शन देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
घाबरून बुकिंग करू नका, पुरवठा पुरेसा आहे
सरकारने जनतेला आश्वस्त केले आहे की देशात गॅसची कोणतीही कमतरता नाही. केवळ भीतीपोटी (Panic Booking) लोक मोठ्या प्रमाणावर सिलिंडर बुक करत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
- सामान्य दिवसांच्या तुलनेत गॅस बुकिंगमध्ये सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली असून, गुरुवारी ७६ लाख सिलिंडरचे बुकिंग झाले आहे.
- परिस्थिती हाताळण्यासाठी देशातील रिफायनरींनी एलपीजीचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढवले आहे.
- तेल कंपन्या दररोज ५० लाख सिलिंडरचा पुरवठा विनाअडथळा करत आहेत.
काळाबाजारावर प्रशासनाची करडी नजर
गॅसच्या टंचाईची अफवा पसरवून काही लोक साठेबाजी किंवा काळाबाजार करण्याची शक्यता आहे. अशा लोकांविरुद्ध सरकारने कडक भूमिका घेतली आहे.
- सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गॅसच्या साठेबाजीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांनी जिल्हा प्रशासनाला अशा प्रवृत्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
- पेट्रोलियम मंत्रालय आणि नागरी पुरवठा विभाग सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेत आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच गॅसची मागणी करावी आणि पीएनजीसारख्या सोयीस्कर पर्यायांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.










