IndiGo flight ticket fuel charge hike : हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने आपल्या सर्व विमान फेऱ्यांवर ‘फ्यूल चार्ज’ म्हणजेच इंधन शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे.
विमान इंधनाच्या दरात ८५ टक्क्यांची वाढ
मध्यपूर्वेतील इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, या भागात विमान इंधनाच्या किमतीत तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. कोणत्याही विमान कंपनीच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा खूप मोठा असतो, त्यामुळे हा बोजा कमी करण्यासाठी इंडिगोला तिकीट दरात वाढ करणे भाग पडले आहे.
तुमच्या प्रवासासाठी किती जास्तीचे पैसे द्यावे लागतील?
इंडिगोने प्रवाशांच्या सोयीचा विचार करून ही दरवाढ मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. नवीन बुकिंगसाठी प्रति क्षेत्र खालीलप्रमाणे अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल:
- देशांतर्गत प्रवास (भारत): ४२५ रुपये
- भारतीय उपखंड: ४२५ रुपये
- मध्य पूर्व देश: ९०० रुपये
- दक्षिण पूर्व आशिया आणि चीन: १,८०० रुपये
- आफ्रिका आणि पश्चिम आशिया: १,८०० रुपये
- युरोप: २,३०० रुपये
परिस्थितीनुसार होणार बदल
विमान कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जागतिक राजकारणातील अचानक झालेल्या बदलांमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, जागतिक परिस्थितीचा सतत आढावा घेतला जाईल आणि इंधनाचे दर कमी झाल्यास या शुल्कात पुन्हा योग्य ते बदल केले जातील, असेही इंडिगोने स्पष्ट केले आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ विमान वाहतूकच नाही, तर जागतिक जहाज वाहतूक आणि तेल उद्योगालाही मोठा फटका बसला आहे.










