Home / देश-विदेश / UAE Arrests Indians: युएईमध्ये 19 भारतीयांना अटक! युद्धाच्या काळात अफवा पसरवणे पडले महागात; मिळू शकते ‘ही’ शिक्षा

UAE Arrests Indians: युएईमध्ये 19 भारतीयांना अटक! युद्धाच्या काळात अफवा पसरवणे पडले महागात; मिळू शकते ‘ही’ शिक्षा

UAE Arrests Indians: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई सरकारने एक मोठी कारवाई केली आहे. सोशल...

By: Team Navakal
UAE Arrests Indians
Social + WhatsApp CTA

UAE Arrests Indians: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई सरकारने एक मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून अफवा पसरवणाऱ्या आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ शेअर करणाऱ्या ३५ जणांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे यामध्ये १९ भारतीयांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायली दलांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर सुरू झालेल्या तणावाचा गैरफायदा घेत हे व्हिडिओ बनवण्यात आले होते.

आरोपींवर कशासाठी झाली कारवाई?

युएईचे ॲटर्नी जनरल डॉ. हमद सैफ अल शम्स यांनी सांगितले की, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी कृत्रिम तंत्रज्ञान म्हणजेच एआयचा वापर करून काही व्हिडिओ तयार करण्यात आले होते. तपासात असे समोर आले आहे की, या आरोपींची तीन गटांत विभागणी करण्यात आली होती:

  1. पहिली टोळी: या गटात ५ भारतीयांसह १० जणांचा समावेश आहे. त्यांनी देशाच्या हवाई हद्दीतील क्षेपणास्त्रे रोखल्याचे खरे व्हिडिओ घेऊन त्यावर भडक कमेंट्स आणि साऊंड इफेक्ट्स टाकले, जेणेकरून लोकांमध्ये दहशत निर्माण होईल. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेची माहिती शत्रूंपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता.
  2. दुसरी टोळी: या ७ जणांच्या गटात ५ भारतीय आहेत. त्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट स्फोट आणि हल्ल्यांचे व्हिडिओ तयार केले. परदेशातील जुने व्हिडिओ युएईमधील असल्याचे भासवून त्यांनी जनतेची दिशाभूल केली.
  3. तिसरी टोळी: या गटात ५ भारतीयांसह ६ जण आहेत. त्यांच्यावर ‘शत्रू राष्ट्राचा’ म्हणजेच इराणचा आणि त्यांच्या लष्करी कारवायांचा उदोउदो केल्याचा आरोप आहे.

शिक्षा आणि दंड

युएईच्या कायद्यानुसार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना किमान १ वर्षाचा तुरुंगवास आणि किमान १,००,००० दिरहाम म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे २२ लाखांहून अधिक रुपयांचा दंड होऊ शकतो. मुलांच्या भावनांचा गैरवापर करून भीती पसरवणे किंवा लष्करी तळांच्या विनाशाचे खोटे दावे करणे याला तिथे गंभीर गुन्हा मानले जाते.

मध्यपूर्वेतील सद्यस्थिती

इराणने युएईमधील तीन महत्त्वाच्या बंदरांना रिकामे करण्याची धमकी दिल्यानंतर तणाव अधिक वाढला आहे. इराणचा आरोप आहे की अमेरिका युएईच्या बंदरांचा वापर इराणच्या तेल तळांवर हल्ले करण्यासाठी करत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मित्रराष्ट्रांना आपली युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे. या सर्व संवेदनशील वातावरणात सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध युएई प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे देखील वाचा – USCIRF Report: भारताचे अमेरिकेला जशास तसे उत्तर! ‘RSS’ आणि ‘RAW’ वर निर्बंधांची शिफारस करणारा अहवाल फेटाळला

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या