Affordable ABS scooters in India list : भारतीय रस्त्यांवर दुचाकी चालवणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. अशातच पावसामुळे निसरडा झालेला रस्ता असो किंवा समोर अचानक आलेले एखादे वाहन, ब्रेक लावताना चाके लॉक होऊन गाडी घसरण्याचा धोका मोठा असतो.
हे टाळण्यासाठी ‘एबीएस’ म्हणजेच अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम हे फिचर आता स्कूटर्समध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्कूटर्सच्या विश्वात सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या आणि खिशाला परवडणाऱ्या ५ सर्वोत्तम मॉडेल्सबद्दल जाणून घेऊया.
१. Hero Xoom 160
या यादीतील सर्वात शक्तिशाली पर्यायापासून सुरुवात करायची झाल्यास ‘हिरो झूम १६०’ चे नाव आघाडीवर येते. १.३७ लाख रुपये किंमत असलेल्या या स्कूटरमध्ये १५६ सीसीचे लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. सुरक्षेसाठी यात फ्रंट डिस्क आणि सिंगल-चॅनल एबीएसची जोड आहे. लांब प्रवासाचा आनंद घेणाऱ्यांसाठी यात विंडस्क्रीन आणि मजबूत सस्पेन्शन सेटअप मिळतो.
२. VLF Mobster 135
तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही स्कूटर सर्वांना मागे टाकते, कारण यात पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही चाकांना ‘ड्युअल-चॅनल एबीएस’ देण्यात आले आहे. १.३० लाख रुपये किंमत असलेल्या या मॉडेलमध्ये १२५ सीसीचे इंजिन असून कीलेस इग्निशन आणि ५-इंचाचा टीएफटी डिस्प्ले यांसारखी आधुनिक फीचर्स यात पाहायला मिळतात.
३. Aprilia SR 175
ज्यांना वेग आणि स्पोर्टी लूक आवडतो त्यांच्यासाठी एप्रिलियाचा हा १७४.७ सीसीचा दमदार स्कूटर उत्तम आहे. १.२६ लाख रुपये किंमत असलेल्या या स्कूटरमध्ये १४ इंचाचे मोठे चाक आणि एबीएसची सुरक्षा देण्यात आली आहे. उत्तम विजिबिलिटीसाठी यात एलईडी लायटिंग आणि प्रगत इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
४. TVS Ntorq 150
तरुणांच्या पसंतीची एनटॉर्क आता अधिक पॉवरफुल झाली आहे. १५० सीसी इंजिनसह येणाऱ्या या मॉडेलची किंमत १.०९ लाख रुपयांपासून सुरू होते. स्पोर्टी परफॉर्मन्ससोबतच यात सिंगल-चॅनल एबीएस मिळते.
५. Suzuki Access 125
सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित पर्यायांमध्ये सुझुकी ॲक्सेस आजही अव्वल आहे. याच्या एबीएस व्हेरिएंटची किंमत ९२,३२८ रुपयांपासून सुरू होते. १२४ सीसी इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आणि उत्तम अंडर-सीट स्टोरेज मिळते. कमी किमतीत सुरक्षितता शोधणाऱ्यांसाठी हा एक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ पर्याय आहे.











