Eid : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिया मुस्लीम समाजाने यंदा 21 मार्च रोजी येणारी रमजान ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिया समाजात दुःखाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी होणारी रमजान ईद यंदा साजरी करू नका, असे आवाहन शिया समाजाच्या धर्मगुरूंकडून केले जात आहे. ईदीच्या दिवशी नवीन कपडे, शिरखुर्मा तसेच इतर गोड पदार्थ बनवले जाणार नाहीत, असा निर्णय शिया मुस्लीम समाजाने घेतला आहे.
शिया मुस्लीम धर्मगुरू मौलाना शबिह एहसन काझमी याबद्दल बोलताना म्हणाले की, सध्या आखातात जे युद्ध सुरू आहे ते इराणवर थोपवण्यात आले आहे, तो इस्रायल आणि अमेरिका यांचा दहशतवाद आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून सुरू झालेल्या युद्धाच्या सुरुवातीलाच 160 ते 170 लहान मुलांचा मृत्यू झाला. शिया मुस्लीम समाजाचे प्रमुख अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केली. त्यांच्या मृत्युमुळे शिया समाजात दुःखाचे वातावरण आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर निदर्शने करून शिया समाजाने आपले दुःख व्यक्त केले. त्यामुळे आम्ही सर्वांनी ही ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मासारखे गोड पदार्थ बनविले जातात. मात्र यावेळी कोणतेही गोड पदार्थ बनवले जाणार नाहीत. नवीन कपडेही खरेदी केले जाणार नाहीत. भेटवस्तू दिल्या जाणार नाहीत. फक्त ईदची नमाज अदा केली जाणार आहे.
दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शिया मुस्लीम समाजानेही असाच निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात 4,000 शिया मुस्लीम राहातात. त्यांनीही यंदा दरवर्षीप्रमाणे उत्साह-आनंदात ईद साजरी न करता साधेपणाने ती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उत्तर प्रदेशातील सुन्नी मुस्लिमांनी इराण युद्धामुळे ईद साजरी न करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे वरिष्ठ कार्यकारी सदस्य मौलाना खालिद रशीद फरंगी महली म्हणाले की, ईद ही एक इबादत आहे. ईद म्हणजे रोजा पाळणार्यांसाठी एक दैवी इनाम असते. तिचा संबंध कोणत्याही एका मानवी घटनेशी नाही. इस्लामी इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांनंतरही ईद साजरी करणे सुरूच राहिले आहे. शिया चंद समितीचे अध्यक्ष मौलाना सैफ अब्बास नक्वी यांनी मुस्लिमांना हातावर काळी पट्टी बांधून ईदची नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे.










