US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारिजानी आणि कमांडर गुलामरेझा सोलतानी यांच्या मृत्यूनंतरही इराणने माघार न घेता लढाई सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची आज म्हणाले की, सर्वोच्च नेते शहीद झाले तरी, आमची यंत्रणा आपले काम करत आहे. एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा कोणताही परिणाम होणार नाही. आमचा लढा सुरूच राहिल. दुसर्या बाजूला आम्ही इराणचेसर्वोच्च नेते मोजताबा यांचे डेथ वॉरंट काढले आहे. त्यांना कुठूनही शोधून संपवू अशी धमकी इस्रायल-अमेरिकेने दिल्याने युद्ध आणखी तीव्र होणार असल्याच्या शक्यतेने जगाची चिंता वाढली.
इराणच्या संरक्षण धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे लारिजानी, तेहरानजवळ त्यांच्या मुलीच्या घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात त्यांचा मुलगा, उपप्रमुख आणि अंगरक्षकांसह ठार झाले. 28 फेब्रुवारी रोजी आखाती युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी माजी
सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या प्रासादावर हल्ला करून अमेरिका-इस्रायलने त्यांना ठार केले होते. लारिजानी यांच्या हत्येची तुलना खामेनी यांच्या हत्येशी केली जात असून दोन सर्वोच्च नेत्यांच्या मृत्यूनंतर इराणचे मनोबल ढासळेल, असे म्हटले जात होते. परंतु अराघची यांनी सांगितले की, इराणच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक यंत्रणा मजबूत आहेत. कोणत्याही एका व्यक्तीच्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम होत नाही. ही व्यवस्था खूप काळापासून अस्तित्वात आहे आणि अनेक आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे. अमेरिका-इस्रायलचे हल्ले बेकायदेशीर आहेत. इराण अशा हल्ल्यांना घाबरत नाही. इराण आपली सुरक्षा आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी आवश्यक पावले उचलेल.
अराघची असेही म्हणाले की, मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धासाठी अमेरिका जबाबदार आहे. हे अमेरिकेचे युद्ध आहे. तिनेच परिस्थिती बिघडवली आहे. इराण नागरिकांना लक्ष्य करत नाही, तर स्वतःवर होणार्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. इराण केवळ बदला घेत आहे. आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या मोठ्या लष्करी उपस्थितीमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. इराणला केवळ युद्धाचा कायमस्वरूपी अंत हवा आहे, तात्पुरती शांतता नको. या युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होईल. या युद्धाचे परिणाम दिसायला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक देशावर हळूहळू त्याचा परिणाम होईल. त्यामुळे इतर देशांनीही याविरोधात आवाज उठवला पाहिजे.
अली लारिजानी यांच्यावरील हल्ल्यानंतर इराणचे गुप्तचर मंत्र, इस्माईल खतीब यांनाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात ते ठार झाल्याचेही वृत्त आहे. मात्र इराणने त्याला दुजोरा दिलेला नाही. लारिजानी यांच्या मृत्यूनंतर इराणने आज इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यामुळे तेल अवीवमध्ये अनेक ठिकाणी आगी भडकल्या. इराणने इस्रायलवर क्लस्टर बॉम्बनेही हल्ला केला. मात्र इस्रायलने असा दावा केला आहे की त्यांनी इराणची अनेक क्षेपणास्त्रे हवेतच निष्प्रभ केली. मात्र काही शहरांमध्ये त्यांचे अवशेष पडल्याने त्यात 2 जणांचा मृत्यू झाला. तर इस्रायली लष्कराने इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठे हवाई हल्ले केल्याचा दावा केला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये इराणची कमांड सेंटर, क्षेपणास्त्र तळ आणि इतर लष्करी आस्थापनांचे नुकसान झाले.
इस्रायली लष्कराने आज म्हटले की, आम्ही मोजतबा यांचे डेथ वॉरंट काढले आहे. मोजतबा क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसतात. त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की, आम्ही त्यांना शोधून काढू, त्यांचा ठावठिकाणा लावू आणि त्यांना संपवू इराणने आज इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून इराणमध्ये एका व्यक्तीला फाशी दिली. त्याने देशातील संवेदनशील भागांची छायाचित्रे आणि महत्त्वाची माहिती मोसादकडे पाठवल्याचा इराणचा आरोप होता. त्याला मागील वर्षी जूनमध्ये सवजबलाघ शहरातून अटक करण्यात आली होती, त्यावेळी इराण आणि इस्रायल यांच्यात 12 दिवसांचे युद्ध सुरू होते.
’जग लाडकी’तून तेल आले
भारतीय ध्वज असलेले ’जग लाडकी’ हे तेलवाहू जहाज गुजरातच्या मुंद्रा येथील बंदरात दाखल झाले. ते संयुक्त अरब अमिरातीमधील फुजैरा बंदरातून होर्मुजच्या सामुद्रधुनीमार्गे भारतात आले. या जहाजात 80,886 मेट्रिक टन कच्चे तेल आहे. भारतात दररोज अंदाजे 900 दशलक्ष लिटर तेलाचा वापर होतो. दोन दिवसांपूर्वी शिवालिक आणि नंदा देवी ही दोन जहाजे मध्य
पूर्वेतून भारतात आली होती. त्यांनी 92,000 मेट्रिक टन एलपीजी भारतात आणला.










