Russian oil tankers diverted to India : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत भारताने आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. चीनला जाणारी रशियन कच्च्या तेलाची किमान ७ मोठी जहाजे आता आपला मार्ग बदलून भारताकडे येत आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी तात्पुरती सवलत दिल्यानंतर हा महत्त्वाचा बदल घडला आहे.
चीनचा मार्ग सोडून भारताकडे कूच
रिपोर्टनुसार, ‘ॲक्वा टायटन’ नावाचे मध्यम आकाराचे टँकर बाल्टिक समुद्रातून चीनच्या रिझाओ बंदराकडे निघाले होते. मात्र, मार्चच्या मध्यावर या जहाजाने अचानक आपला मार्ग बदलला आणि आता ते २१ मार्च रोजी कर्नाटकच्या नव मंगलोर बंदरात दाखल होणार आहे. तसेच ‘झौझौ एन’ हे दुसरे जहाज २५ मार्च रोजी गुजरातच्या सिक्का बंदरावर पोहोचण्याची शक्यता आहे. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदीचा वेग वाढवला आहे.
भारताला या निर्णयाचा काय फायदा?
भारताला आपली ९० टक्के ऊर्जेची गरज आयातीतून पूर्ण करावी लागते. हॉर्मुझचा मार्ग बंद झाल्याने भारतात स्वयंपाकाच्या गॅसचा (एलपीजी) तुटवडा जाणवू लागला होता, ज्यामुळे मुंबई आणि बेंगळुरूमधील काही हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली होती.
- मोठी खरेदी: गेल्या आठवड्यात भारताने रशियाकडून सुमारे ३० दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा सौदा केला आहे.
- अमेरिकेची सवलत: अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची विशेष सवलत दिली आहे, ज्यामुळे रशियावर असलेले निर्बंध भारतासाठी शिथिल झाले आहेत.
- टंचाईवर मात: रशियातून येणाऱ्या या ७ जहाजांमुळे भारतातील कच्च्या तेलाचे संकट तात्पुरते टळण्यास मोठी मदत होणार आहे.
इराण युद्धाचा भारतावर परिणाम
हॉर्मुझची सामुद्रधुनी हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, कारण भारताचे ४० ते ५० टक्के कच्चे तेल आणि निम्म्याहून अधिक एलएनजी आयात याच मार्गावरून होते. युद्धामुळे या मार्गावर सुमारे २० जहाजे अद्याप अडकून पडली आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय जहाजांच्या वाहतुकीसाठी इराणसोबत कोणताही कायमस्वरूपी करार झालेला नाही, त्यामुळे रशियाकडून मिळणारा हा तेल पुरवठा भारतासाठी ‘जीवनदान’ ठरणार आहे.









