Pune Rape Case News : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या बालिकेवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने देश हादरला आहे. या प्रकरणाची आता राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वेच्छा दखल (Suo Motu Cognisance) घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, ही घटना लहान मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
Pune Rape Case News : महिला आयोगाची प्रमुख पावले आणि मागण्या
- बाल हक्क आयोगाला आवाहन: राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला (NCPCR) या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या तपासावर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा होईल, याची खात्री करण्यास सांगितले आहे.
- फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी: हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने याचा खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवून जलद गतीने निकाल लावण्यात यावा, अशी मागणी आयोगाने केली आहे.
- पोक्सो अंतर्गत कारवाई: या घटनेप्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत निश्चित वेळेत दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
- पीडित कुटुंबाला मदत: पीडित कुटुंबाला लवकरात लवकर कायदेशीर मदत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यावर आयोगाने भर दिला आहे.
Pune Rape Case News :आयोगाचा तीव्र निषेध
राष्ट्रीय महिला आयोगाने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, “ही अमानवीय घटना समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. प्रत्येक बालिकेची सुरक्षा आणि तिला न्याय मिळवून देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.” अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे देशातील लहान मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली असल्याचेही आयोगाने नमूद केले.
Pune Rape Case News :नेमकी घटना काय?
पुण्याच्या नसरापूर परिसरात 1 मे रोजी 65 वर्षांच्या एका नराधमाने 4 वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह लपवून ठेवला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या नराधमाला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.









