Diljit Dosanjh – पंजाबी व बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक Diljit Dosanjh सध्या आपल्या ‘ऑरा वर्ल्ड टूर’मुळे (Aura World Tour)चर्चेत आहेत. अमेरिकेतील कॅलगरी येथे पार पडलेल्या त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एक तणावपूर्ण प्रसंग घडला. कार्यक्रमादरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी (Khalistani)पोस्टर दाखवत विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे दोसांझ यावेळी स्टेजवरूनच संतापलेले दिसले.
दोसांझ यांनी स्टेजवरून स्पष्ट शब्दांत इशारा देत, “ज्याला विरोध करायचा आहे, त्याने थेट मैदानात यावे,” असे सांगितले. त्यांनी Sidhu Moose Wala यांच्या शैलीत मांडीवर थाप मारत विरोधकांना आव्हान दिले. “कोणी मर्यादा ओलांडली, तर त्याला थेट बाहेर फेकून देईन,” असा कडक इशाराही त्यांनी दिला.
विरोधकांवर सवाल उपस्थित करत दोसांझ म्हणाले की, “जे लोक आज विरोध करत आहेत, त्यांनी पंजाबसाठी नेमकं काय केलं आहे?” त्यांनी स्वतःच्या कामाचा उल्लेख करत सांगितले की, पंजाबमध्ये आलेल्या पुराच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्य केले, लोकांसाठी घरे उभी केली आणि सहा महिने जमिनीवर राहून सेवा केली.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्वतःची जाहिरात करण्यासाठी नव्हे, तर पंजाबचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. “मी जिथेही जातो—राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय—तिथे नेहमी पंजाबबद्दल बोलतो. त्यासाठी विरोध होत असेल, तर मी त्यासाठी तयार आहे,” असे ते ठामपणे म्हणाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दोसांझ यांच्या भूमिकेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय आहे प्रकरण?

बंदी घातलेल्या Sikhs for Justice या संघटनेचा नेता Gurpatwant Singh Pannun यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत दोसांझ यांच्यावर आरोप केले. त्यांनी दोसांझ हे भारत सरकारच्या विचारसरणीचा प्रचार करत असल्याचा दावा केला.
दरम्यान, कॅनडातील Vancouver येथे झालेल्या दोसांझ यांच्या कॉन्सर्टदरम्यानही खलिस्तान समर्थकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी भारतविरोधी घोषणा देण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
पन्नून यांनी पुढे इशारा देत सांगितले की, दोसांझ यांच्या आगामी कार्यक्रमांमध्ये—कॅलगरी, एडमंटन, विनिपेग, टोरोंटो तसेच अमेरिकेतील काही शहरांमध्ये—विरोध प्रदर्शन केले जाईल. त्यामुळे त्यांच्या आगामी कार्यक्रमांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही त्यांच्या काही परदेशातील कार्यक्रमांपूर्वी अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.पंजाबी सिनेसृष्टीतून कारकिर्दीची सुरुवात करून बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दोसांझ यांना ‘किंग ऑफ पंजाबी फिल्म्स’ म्हणूनही ओळखले जाते.
हे देखील वाचा –
टोनी स्टार्कचं स्वप्न सत्यात! रशियन इंजिनिअरने बनवला खऱ्या आयुष्यातील ‘आयर्न मॅन’ सूट; पाहा व्हिडिओ











