Devendra Fadnavis Action On Ashok Kharat : नाशिकमधील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदू मांत्रिक अशोक खरात याच्या अटकेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच, आता या कारवाईमागील एक मोठी माहिती समोर आली आहे. खरातला गजाआड करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दोन आठवड्यांपूर्वीच सूत्रे हलवली होती. मुख्यमंत्र्यांच्या थेट निर्देशानंतर आणि पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतरच नाशिक पोलिसांनी हा अत्यंत गोपनीय आणि थरारक सापळा रचून कारवाई केली.
मुख्यमंत्र्यांचे थेट लक्ष आणि दोन आठवड्यांपूर्वीचे आदेश-
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वीच त्यांनी पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून या प्रकरणी कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. कोणत्याही राजकीय दबावाचा विचार न करता पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या, ज्यामुळे पोलिसांना तपासासाठी मोकळे रान मिळाले.
महत्त्वाचे पुरावे आणि व्हिडीओ पोलिसांच्या आधीच ताब्यात-
कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी तांत्रिक तपास अत्यंत सूक्ष्मपणे केला होता. खरातच्या कृष्णकृत्यांशी संबंधित अनेक गंभीर व्हिडीओ क्लिप्स आणि तांत्रिक पुरावे पोलिसांनी कारवाईच्या दोन आठवड्यांपूर्वीच आपल्या ताब्यात घेतले होते. एकदा का भक्कम पुरावे हाती आले, त्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नाशिक गुन्हे शाखेला (Crime Branch) हिरवा कंदील दाखवण्यात आला.
‘चोर शिरल्याचा’ बनाव आणि अटकेचा थरार-
अशोक खरातला अटक करण्याची प्रक्रिया एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे थरारक होती. खरातला अटकेची कुणकुण लागली तर तो पसार होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी योजनाबद्ध सापळा रचला. ज्या परिसरात खरात राहत होता, तिथे पोलिसांनी “चोर शिरला आहे” असा बनाव रचला. यामुळे स्थानिक नागरिक किंवा खरातच्या समर्थकांना संशय आला नाही. पोलिसांचे एक पथक घराच्या मागील बाजूने सज्ज होते, तर दुसऱ्या पथकाने घरात शिरून खरातला झोपेतच ताब्यात घेतले.
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र-
खरातला अटक झाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या भोंदू बाबाची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांना पदावरून पायउतार होण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, “चाकणकरांना नेमके कोण वाचवत आहे?” असा सवाल उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनीही आपल्याच पक्षाच्या नेत्याविरोधात भूमिका घेत, “चाकणकर पदावर राहिल्यास तपासातील पुरावे नष्ट होऊ शकतात,” अशी भीती व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जरी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकर यांची पाठराखण केली असली, तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे आता चाकणकर यांच्यावरील दबाव प्रचंड वाढला आहे.










