Home / देश-विदेश / Iran Oil Waiver : इराणी तेलावरील निर्बंध महिनाभरासाठी हटवले ! 14 कोटी बॅरल तेल बाजारात येणार! भारताला फायदा

Iran Oil Waiver : इराणी तेलावरील निर्बंध महिनाभरासाठी हटवले ! 14 कोटी बॅरल तेल बाजारात येणार! भारताला फायदा

Iran Oil Waiver: आखाती युद्धात इराण व अमेरिका-इस्रायल या दोन्ही बाजूंकडून माघारीची चिन्ह दिसत नसतानाच आज अमेरिकेने इराणी तेल खरेदीवरील...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Iran Oil Waiver: आखाती युद्धात इराण व अमेरिका-इस्रायल या दोन्ही बाजूंकडून माघारीची चिन्ह दिसत नसतानाच आज अमेरिकेने इराणी तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची सवलत जाहीर केली. ही सवलत केवळ समुद्रात असलेल्या इराणी जहाजांवरील तेल खरेदीसाठी आहे. जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ही सवलत देण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे 14 कोटी बॅरल तेल बाजारात येणार असून, यातील मोठ्या प्रमाणावर तेल भारत विकत घेऊ शकत असल्याने भारताला फायदा होणार आहे.


अमेरिकेचा हा निर्णय युद्ध संपण्याच्या दृष्टीने एक पाऊल समजले जात असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशा कुठल्याही शक्यतेचा इन्कार केला आहे. युद्ध संपण्याच्या जवळ आहे, पण युद्धविराम करणार नाही, अशी भूमिका जाहीर करून त्यांनी जगाची चिंता कायम ठेवली आहे. अमेरिका-इस्त्रायलच्या इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती 115 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी त्या 70 डॉलरच्या आसपास होत्या.


इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेलवाहक जहाजांच्या वाहतुकीला बंदी घातल्याने जगभरात तेलटंचाई निर्माण झाली आहे. यामुळेच तेलाचे भाव वाढत आहेत. होर्मुजमार्गे जगातील 20 टक्के तेलवाहतूक होते. युद्धामुळे सध्या या सामुद्रधुनीत इराणसहित अनेक देशांची जहाजे अडकली आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी आणि तेलाची कमतरता भरून काढण्यासाठी अमेरिकेने इराणी तेलावरील निर्बंध तात्पुरते हटवण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत सुमारे 440 दशलक्ष अतिरिक्त बॅरल तेल आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाची आवक संतुलित राहून भाव कडाडणार नाहीत, असा अमेरिकेचा दावा आहे.


अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट म्हणाले की, ही सवलत 19 एप्रिलपर्यंत असेल. ती केवळ आधीच मार्गात असलेल्या तेलाला लागू आहे. नवीन मागणीला नाही. जगासाठी हा तेलसाठा  तात्पुरता खुला केल्याने जागतिक बाजारात सुमारे 14 कोटी बॅरल तेल उपलब्ध होईल. यामुळे जगभरात ऊर्जेची उपलब्धता वाढेल आणि पुरवठ्यावर असलेला तात्पुरता दबाव कमी होण्यास मदत होईल. मात्र इराणला यातून फारसा महसूल मिळणार नाही. अमेरिका इराणच्या क्षमतेवर दबाव कायम ठेवेल. त्यामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेलवाहतूक रोखण्याचा फायदा इराणला उठवता येणार नाही.  


विशेष म्हणजे, ट्रम्प प्रशासनाने ती दिवसांपूर्वी नवीन ‌‘जनरल लायसन्स‌’ जारी करून 12 मार्चपर्यंत लोड झालेल्या रशियन टँकरमधून तेल विकण्याची परवानगी दिली आहे. ही सवलतही 11 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, याचा रशियाला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांना युक्रेन युद्ध अधिकाधिक काळ चालू ठेवण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे.


लिपो ऑईल असोसिएट्सचे प्रमुख अँड्य्रू लिपो म्हणाले की, इराण आधीच ‌‘शॅडो फ्लीट‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टँकर्सवर आपले तेल भरत होता,  मात्र अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन करून इराणचे तेल खरेदी करण्यास कोणताही ग्राहक तयार नसल्यामुळे हे टँकर समुद्रात अडकून पडले होते. आता भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि तुर्की हे तेल खरेदी करू शकतात. भारत यापूर्वीही इराणकडून तेल खरेदी करत होता. परंतु अमेरिकेने भारतावर निर्बंध लादल्याने भारताने तेलखरेदी बंद केली होती. यात भारताचे मोठे नुकसान झाले होते. कारण इराण भारताला भारतीय चलनात तेल विकत होता. आता इराणी जहाजावरील तेलाच्या विक्रीतून मिळणारे पैसे कोणाला मिळतील हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एकीकडे अमेरिका इराणसोबत युद्धात गुंतली आहे आणि दुसरीकडे तिला तेल विकून पैसे कमवण्याची परवानगी दिली जात आहे, ज्यामुळे युद्ध आणखी भडकू शकते.


इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जपानी जहाजांना सुरक्षितपणे जाण्यासाठी मदत करण्यास इराण तयार आहे. आम्ही होर्मुजची सामुद्रधुनी बंद केलेली नाही; ती खुली आहे. जपानसारख्या देशांनी तेहरानसोबत संवाद साधला, तर इराण त्यांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग सुनिश्चित करू शकतो. इराणला केवळ युद्धविराम नको, तर युद्धाचा अंत हवा आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र कोणत्याही प्रकारचा युद्धविरामाची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाजूला पूर्णपणे उद्ध्वस्त करत असता, तेव्हा युद्धविराम होत नाही. या युद्धात अमेरिका आधीपासून वरचढ चढली आहे. त्यामुळे आता युद्ध थांबवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. इराणसोबत सुरू असलेले युद्ध पुढील चार ते सहा आठवड्यांत संपू शकते. आम्ही आमची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. इराणची क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे निकामी करणे, त्यांचा संरक्षण औद्योगिक तळ उद्ध्वस्त करणे आणि त्यांचे नौदल व वायुसेना संपवणे, हे आम्ही साध्य केले आहे. आता इराण कधीही अण्वस्त्रे विकसित करू शकणार नाही. तसे त्यांनी केले अमेरिका लगेच त्याला प्रत्युत्तर देईल.


नाटोचे देश भित्रे निघाले, पण अमेरिकेशिवाय ही लष्करी आघाडी कागदी वाघासारखी आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या इतर देशांनी तिचे रक्षण आणि संचालन करणे आवश्यक आहे. अमेरिका तिचे रक्षण करणार नाही. अमेरिका मदत करू शकते, पण या मदतीची गरज भासू नये. आम्ही या देशांना त्यांच्या होर्मुजमधील प्रयत्नांत मदत करू, परंतु एकदा इराणचा धोका पूर्णपणे नष्ट झाला की याची गरज उरणार नाही.


इराणच्या अणुकेंद्रावर,
अमेरिकेच्या बेटावर हल्ला

अमेरिका आणि इस्रायलने आज सकाळी इराणच्या नतान्झ अणुकेंद्रावर हवाई हल्ला केला. मात्र, या हल्ल्यातकोणतीही किरणोत्सर्गी (धोकादायक अणु) गळती झाली नाही, परिसरातील रहिवाशांना कोणताही धोका पोहोचला नाही.  गेल्या वर्षीही अमेरिका आणि इस्रायलने याच अणुकेंद्राला लक्ष्य केले होते. तर इराणने हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावरील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. तो निकामी केल्याचा दावा अमेरिकेने केला. दिएगो गार्सिया बेट हिंद महासागराच्या मध्यभागी असून ते सामरिकदृष्ट्‌‍या महत्त्वाचे मानले जाते.


मोदींनी इराणी राष्ट्राध्यक्षांना
ईदीच्या शुभेच्छा दिल्या

पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष  मसूद पाझाश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले की, या सणासुदीच्या काळात पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य नांदेल, अशी आशा आहे. या प्रदेशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर होणारे हल्ले चुकीचे आहेत. कारण त्यामुळे परिस्थिती बिघडून  जागतिक व्यापारावर परिणाम होतो. सागरी मार्ग (जहाजांचे मार्ग) सुरक्षित आणि खुले राहिले पाहिजेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या