Home / महाराष्ट्र / Pawanraje Nimbalkar murder case : पवनराजेंची हत्या कुणी केली? सर्व आरोपी निर्दोष ! पोलीस आणि सीबीआयने पुरावे शोधलेच नाहीत

Pawanraje Nimbalkar murder case : पवनराजेंची हत्या कुणी केली? सर्व आरोपी निर्दोष ! पोलीस आणि सीबीआयने पुरावे शोधलेच नाहीत

Pawanraje Nimbalkar murder case : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणार्‍या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी आज तब्बल 20 वर्षांनंतर विशेष सीबीआय...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Pawanraje Nimbalkar murder case : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणार्‍या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी आज तब्बल 20 वर्षांनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व नऊ आरोपींची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा या हत्याप्रकरणाचा तपास पोलीस आणि सीबीआयने योग्य प्रकारे केला नाही. आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले नाहीत, त्यांचे सीडीआर मिळवले नाहीत आणि आरोप निःसंशयपणे सिद्ध होतील असे ठोस पुरावेच दिले नाहीत, अशा शब्दात न्यायाधीशांनी सीबीआय आणि पोलीस या तपास यंत्रणांचे वाभाडे काढत वारंवार जबाब बदलणार्‍या माफीच्या साक्षीदाराच्या भरवशावर केवळ संशयाच्या आधारे आरोपींना दोषी ठरवता येत नाही, असा स्पष्ट निर्वाळा  दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व आरोपी निर्दोष ठरल्याने पवनराजेंची हत्या केली कोणी, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे.


या खटल्यातील नऊ आरोपींपैकी सात आरोपी आज न्यायालयात हजर होते. सीबीआयने मुख्य सुत्रधार ठरवलेले राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेतून न्यायालयात आले. पवनराजेंचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर कुटुंबियांसह सकाळी दहा वाजताच न्यायालय परिसरात दाखल झाले होते
निकालाचे वाचन सुरू करताना सुरुवातीलाच न्यायाधीशांनी माफीचा साक्षीदार हा फितूर झाला असून त्याने आपले जबाब वेळोवेळी बदलले आहेत. त्याच्या जबाबांमध्ये कमालीची विसंगती आढळून आली आहे. त्यामुळे त्याच्या जबाबावर विसंबून राहता येणार नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी सीबीआय व पोलिसांनी तपासात केलेला ढिसाळपणा आणि ठेवलेल्या त्रुटींचा पाढाच वाचला.पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले नाहीत. अटक करताना त्यांच्या खिशात काय काय होते याचा उल्लेख  आरोपपत्रात नाही.तपास यंत्रणांनी जर वेळीच आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून त्यातील सीडीआर मिळवला असता तर आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते किंवा नाही याचा ठोस पुरावा मिळाला असता.आरोपींच्या घरांची झडती घेतली,  मात्र त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही असे पोलीस सांगतात. दुसरी गोष्ट म्हणजे घटना घडली तेव्हा केलेल्या पंचनाम्यात पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या इंडिका गाडीबद्दल दिलेली माहिती विरोधाभासी आणि संशयास्पद आहे. इंडिका गाडी जेव्हा जप्त केली तेव्हा ती जळून खाक झाली होती, असे पोलीस एकीकडे म्हणतात आणि त्याचवेळी गाडीचा रंग हिरवा होता, असेही नमूद करतात.

गाडी जर जळून खाक झाली होती तर तिचा रंग हिरवा होता हे पोलिसांनी कसे काय लिहिले? जर गाडीच्या कागदपत्रातून पोलिसांना गाडीचा रंग हिरवा होता अशी माहिती मिळाली असेल तर तसा उल्लेख पोलिसांनी करणे आवश्यक होते. परंतु तसा उल्लेख पोलिसांनी केलेला आढळत नाही. गाडी कुठे आढळली याबद्दलही संदिग्धता आहे. पवनराजे निंबाळकर यांची स्कोडा कार रस्त्याच्या डाव्या बाजुला की उजव्या बाजुला उभी होती याबद्दलही ठोस माहिती आरोपपत्रात नाही.25 लाख रुपयांची सुपारी देऊन पवनराजेंची हत्या करवण्यात आली असा पोलिसांचा आरोप आहे. मात्र या पैशांच्या देवाणघेवाणीचा कुठलाही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. माफीचा साक्षीदार याने वारंवार आपल्या जबाबामध्ये बदल केला. एका जबाबात त्याने सांगितले की, त्याच्या मालकीचे मुंबईत सहा फ्लॅट आहेत.

राजस्थानमध्ये दोन बंगले आहेत. त्याच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे आणि तो पोलिसांचा खबर्‍या म्हणून काम करत होता. त्याच्या या जबाबावरून तो धनिक असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे 25 लाख रुपयांच्या लालसेपोटी तो असे कृत्य करेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. एका जबाबात त्याने तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांच्या पथकाने आपला प्रचंड छळ केला, असे सांगितले आहे.  त्यावर तपास यंत्रणा यांनी मारिया यांचा जबाब नोंदवून घेणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले नाही. राकेश मारिया यांचा जबाब आरोपपत्रात नाही, असे म्हणत न्यायालयाने तपासातील एकेका त्रुटीवर बोट ठेवले. त्याचबरोबर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी केलेल्या दाव्याची खातरजमा करून पोलिसांनी दावा सिद्ध होईल, असा पुरावा दिलेला नाही. आनंदीदेवी यांच्या पहिल्या जबाबात आरोपीला पाहिल्याचा उल्लेख नाही. मात्र दुसर्‍या जबाबामध्ये उल्लेख आहे. या विसंगतीमुळे त्यांच्या जबाबावर विश्वास ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले. हल्लेखोर पिंटू सिंग आपल्याला आपल्या घराच्या आसपास फिरताना दिसला होता, असा दावा आनंदीदेवी निंबाळकर यांनी दुसर्‍या जबाबामध्ये केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला.


गुन्ह्यामध्ये वापरलेले रिव्हॉव्हर आरोपींनी बिहारच्या सिवानमधून विकत घेतले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र आरोपींचा बिहारपर्यंतचा प्रवास कसा झाला, आरोपींनी रिव्हॉल्व्हर कोणाकडून विकत घेतले याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी संगतवारपणे दिलेला नाही. आरोपींनी रिव्हॉल्व्हर सिवानमधूनच विकत घेतले अशी साक्ष देणार्‍या हरी कृष्ण यादव याच्या जबाबामध्ये विसंगती असल्याने तोही जबाब न्यायालयाने फेटाळून लावला. एकूणच चौकशी अत्यंत ढिसाळ करण्यात आल्याने सर्व आरोपी सुटले. ही हत्या झाली तेव्हा आरोपी पद्मसिंह राज्याचे गृह राज्यमंत्री होते हे विशेष आहे.


3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवकडे (उस्मानाबाद) जाताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर यांची गाडी अडवून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात पवनराजे आणि त्यांचा वाहन चालक समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला होता. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
हा खटला पोलिसांनी खोट्या साक्षी, खोटे पुरावे गोळा करून खोट्या गुन्ह्यात पद्मसिंह पाटील यांना गोवले होते. त्यामुळे हे आरोप न्यायाच्या कसोटीवर टिकणार नाहीत, याची आम्हाला खात्री होती. पाटील यांची राजकीय घोडदौड रोखण्यासाठी केलेले हे कारस्थान आहे. न्यायालयाने आज दिलेला निर्णय पुरेसा स्पष्ट आहे,असे पद्मसिंह पाटील यांचे वकील अ‍ॅड.भूषण महाडिक यांनी सांगितले.
ओमराजे निंबाळकर यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असे जाहीर केले आहे, त्यावर तुमचे मत काय असा सवाल माध्यमांनी विचारला असता, न्याय मागण्याचा अधिकार घटनेने सर्वांना दिला आहे.निंबाळकर कुटुंबियांनाही तो आहे. ते उच्च न्यायालयात गेल्यास आम्ही तिथेही आमची बाजू अधिक ताकदीने मांडू, असे महाडिक म्हणाले.

हत्या कोणी केली हे
परमेश्वरानेच सांगावे

हा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. वीस वर्षे आम्ही न्यायासाठी मोठा लढा लढलो. मात्र दुर्दैवाने आम्हाला न्याय मिळाला नाही. न्यायालयाने  सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे माझ्या वडिलांची हत्या कोणी केली हे आता परमेश्वरानेच आम्हाला सांगावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.  या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी
जाहीर केले.

षडयंत्र जनतेसमोर आणणार
राणा जगजितसिंह यांचा इशारा

निकालानंतर पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी उशिरा का होईना, न्याय मिळाला याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया दिली. आपल्या वडिलांना त्रास देण्यासाठी हे संपूर्ण षडयंत्र आखले गेले. घटना घडल्याच्या पहिल्या महिन्यापासून या घटनेचा राजकीय लाभ घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे कारस्थान कोणी केले याची माहिती माझ्याकडे आहे. न्यायालयाचा लेखी निकाल हाती आल्यानंतर त्याचे सखोल वाचन करून सर्व पुराव्यानिशी मी खर्‍या सुत्रधारांचा पर्दाफाश करीन, असा इशारा राणा जगजितसिंह यांनी दिला.

उबाठाचे शिवसैनिक कोर्टाबाहेर जमले
न्यायालयात निकालाचे वाचन सुरू असताना न्यायालयाबाहेर उबाठाचे शिवसैनिक जमले होते. उबाठातून फुटलेल्या सहा खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्याने ते काहीतरी गडबड करतील म्हणून पोलिसांनी त्यांना दूरवरच रोखले होते. या शिवसैनिकांशी माध्यमांनी संवाद साधला असता आम्ही ऑपरेशन तुडवा राबवण्यासाठी येथे आलो आहोत. ओमराजे न्यायालयातून बाहेर येण्याची वाट पहात आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून दूर पिटाळले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या