NEET-UG : उद्या होत असलेली नीट-यूजी फेरपरीक्षा सुरक्षित, पारदर्शकपणे आणि कोणत्याही गोंधळाशिवाय पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने पोलीस, जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय संस्था यांच्या समन्वयाने त्रिस्तरीय अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. सर्व काही सुरळीत पार पडावे यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) आज देशभरात मॉकड्रीलही घेतले. मात्र एवढे करूनदेखील एनटीएने एक घोळ आज समोर आल्याने पालकांच्या छातीत धस्स झाले. नागपुरातून ही परीक्षा देणार्या एका विद्यार्थ्याला चक्क संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी शहरातील परीक्षा केंद्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली.
विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, तो कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून परीक्षा देणार आहे ही अत्यंत प्राथमिक माहिती हाती असताना एनटीएच्या अधिकार्यांनी किंवा त्यांच्या डिजिटल यंत्रणेने नागपूरच्या अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला अबुधाबीमधील केंद्र दिलेच कसे, असा प्रश्न उपस्थित झाला. अब्दुल्लाच्या वडिलांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता त्याचे हॉल तिकीट डाउनलोड केले तेव्हा परीक्षा केंद्र म्हणून अबुधाबीच्या शाळेचे नाव पाहून त्यांना धक्काच बसला.अब्दुल्ला तर ढसाढसा रडू लागला. मला आता परीक्षाच द्यायची नाही, असे तो म्हणू लागला. अखेर त्याच्या आईने त्याची समजूत घातली. त्यानंतर अब्दुल्लाच्या वडिलांनी तातडीने हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला. तिथे त्यांना मेल पाठवण्यास सांगण्यात आले. मेल पाठवल्यानंतर एनटीएकडून त्यांना फोन आला. शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत नवीन हॉल तिकीट जारी केले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत अब्दुल्लाचे लक्ष अभ्यासावर न राहता हॉल तिकीटचे काय होणार याकडे लागून राहिले. ही गोष्ट एनटीएसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे,असे अब्दुल्लाचे वडील म्हणाले.
एनटीएच्या या बेजबाबदार कारभारावर काँग्रेसचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. भाजपा सरकार देशातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करत आहे. नीट पेपरफुटीनंतर देशभरातील 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अनेकांचे भवितव्य उद्ध्वस्त झाले. आता नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट आखाती देशात परीक्षा केंद्र देणे हे सरकारचे महापाप आहे, अशा शब्दात पटोले यांनी सरकारवर हल्ला चढवला.










