Shiv Thakare And Prince Narula : आपल्या रांगड्या स्वभावाने, जिद्दीने आणि दर्जेदार खेळाने अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला ‘आपला माणूस’ अर्थात शिव ठाकरे याने मनोरंजनाच्या विश्वात पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ‘द फिफ्टी’ (The 50) या गाजलेल्या रिॲलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा तो महाविजेता ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे विजेता होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, मात्र आता अधिकृतपणे त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे.
मैत्रीचा विजय आणि त्यागाचा आदर्श
शिव ठाकरेचा हा विजय केवळ त्याच्या कौशल्याचा नसून, तो खऱ्या मैत्रीचाही विजय ठरला आहे. या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी अत्यंत कठीण असा ‘तिकीट टू फिनाले’ हा टास्क पार पडला होता. या आव्हानात्मक खेळात शिव ठाकरेला सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, याच वेळी रिॲलिटी शोचा अनभिषिक्त राजा मानला जाणारा आणि आजवर एकही रिॲलिटी शो न हारलेला प्रिन्स नरुला देखील या खेळात सहभागी होता.
प्रिन्सने आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर फायनलचे तिकीट मिळवले होते. परंतु, एका सच्च्या मित्राची जिद्द ओळखून प्रिन्सने मोठ्या मनाने आपले हक्काचे ‘तिकीट टू फिनाले’ शिव ठाकरेला बहाल केले. प्रिन्सच्या या अनपेक्षित आणि उमद्या निर्णयामुळे शिवला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळाली. एका निष्णात खेळाडूने दुसऱ्या प्रतिभावान खेळाडूसाठी केलेला हा त्याग या शोच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षण ठरला.
जिद्दीचा प्रवास आणि ऐतिहासिक यश-
अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर शिव ठाकरेने आपल्या खेळातील सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. रोडीज, बिग बॉस मराठी आणि बिग बॉस हिंदीमधील आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर त्याने ‘द फिफ्टी’चे पहिले जेतेपद आपल्या नावे केले. अमरावतीसारख्या शहरातून येऊन देशातील सर्वात कठीण रिॲलिटी शोमध्ये आपली मोहोर उमटवणाऱ्या शिवच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शिव ठाकरे ‘द फिफ्टी’चा महाविजेता; ५० लाखांच्या बक्षीस रक्कमेचे गूढ नेमके काय?
१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या थरारक शोमध्ये मनोरंजन आणि सोशल मीडिया विश्वातील एकूण ५० दिग्गज स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत शिवने फैसू, काका जी, रजत दलाल आणि कृष्णा श्रॉफ यांसारख्या तगड्या स्पर्धकांना धूळ चारत या पहिल्या पर्वाची प्रतिष्ठित ट्रॉफी आपल्या नावे केली. मात्र, या विजयासोबतच एका विशेष चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले आहे, ती म्हणजे शिवला मिळालेली ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम.
विजेतेपदाची घोडदौड आणि तगडी स्पर्धा-
शिव ठाकरेचा हा विजय सहजासहजी मिळालेला नाही. रिॲलिटी शोचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिवने यापूर्वी ‘बिग बॉस मराठी २’चे विजेतेपद पटकावले होते, तर ‘बिग बॉस १६’ मध्ये तो उपविजेता (रनर-अप) राहिला होता. ‘द फिफ्टी’च्या व्यासपीठावर त्याने सुरुवातीपासूनच आपला प्रभाव टिकवून ठेवला. विशेषतः अंतिम फेरीत त्याने दाखवलेली चपळता आणि धोरणात्मक खेळीमुळे तो इतर अंतिम स्पर्धकांपेक्षा सरस ठरला. ‘रिॲलिटी शोचा किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिन्स नरुलाने दिलेल्या संधीचे शिवने सोने केले आणि स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले.
ग्रँड फिनालेच्या दिमाखदार सोहळ्यात शिवने मानाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मात्र, या विजयापेक्षाही शिवने घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा सध्या संपूर्ण देशभरात होत आहे. या शोच्या नियमानुसार, विजेत्याला मिळणारी ५० लाख रुपयांची भरघोस रक्कम शिवला स्वतःला मिळणार नसून, ती त्याच्या एका भाग्यवान चाहत्याला प्रदान करण्यात आली आहे.
चाहता झाला लखपती: शिवचे अनोखे दातृत्व-
‘द फिफ्टी’ या शोच्या विशेष नियमानुसार, विजेत्या स्पर्धकाच्या नोंदणीकृत फॉलोअर्सपैकी एकाची ‘नंबर वन फॅन’ म्हणून निवड केली जाणार होती. शिव ठाकरे या स्पर्धेचा महाविजेता ठरल्यानंतर, त्याचा सर्वात मोठा चाहता सीताराम प्रल्हाद अघाव याला भाग्यवान विजेता म्हणून घोषित करण्यात आले. शिवच्या मेहनतीमुळे आणि नशिबाच्या साथीमुळे सीताराम अघाव हे एका रात्रीत लखपती झाले असून, ५० लाख रुपयांची संपूर्ण बक्षीस रक्कम त्यांना सुपूर्द करण्यात आली आहे. आपल्या लाडक्या कलाकाराच्या विजयामुळे एका सामान्य चाहत्याचे नशीब फळफळल्याचे हे दुर्मिळ उदाहरण पाहायला मिळाले.










