Vanchit Bahujan Aghadi Protests : उपराजधानी नागपूरमध्ये आज राजकीय संघर्षाचे अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग आणि महाल येथील मुख्यालयावर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्तपणे ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या व्यापक स्तरावर राजकीय निषेध नोंदवण्यात आला असून, प्रशासनाने परवानगी नाकारलेली असतानाही हजारो कार्यकर्त्यांनी संविधान चौकातून संचलनाला सुरुवात केली. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
‘एपस्टीन फाईल्स’ आणि सार्वभौमत्वाचा प्रश्न-
या मोर्चाचा मुख्य रोख आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणावर होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर घणाघाती आरोप करताना सांगितले की, या फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची नावे आल्यामुळे केंद्र सरकार अमेरिकेच्या दबावाखाली आले आहे. “या दबावापोटी पंतप्रधानांनी भारताचे हित गहाण ठेवून व्यापार करार केले असून, देशाला आर्थिक गुलामगिरीकडे ढकलले आहे,” असा आरोप त्यांनी केला. देशात इंधनाचा तुटवडा असतानाही सरकार गप्प का, असा सवाल करत त्यांनी संसदेतून पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवरही कडक टीका केली.
संघाची भूमिका आणि नैतिकता-
मोर्चादरम्यान संघ मुख्यालयाला संविधान आणि तिरंगा भेट देण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला होता. मात्र, पोलीस बंदोबस्तामुळे कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. “सरसंघचालक मोहन भागवत संविधानाला घाबरून दिल्लीला निघून गेले आहेत,” अशी खोचक टीका यावेळी करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, संघाने नरेंद्र मोदींना निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र तो धुडकावून मोदी ‘सैराट’ झाले आहेत. संघात आता कोणतीही नैतिकता उरलेली नाही आणि भाजपच्या नाचक्कीला घाबरूनच या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, असा दावाही त्यांनी केला.
परराष्ट्र धोरण आणि अमेरिकन दबाव-
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात भारताच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “अमेरिकन मालावर भारतात शून्य टक्के कर आणि भारतीय मालावर अमेरिकेत १८ टक्के कर, हा भारताला गुलाम बनवण्याचा प्रकार आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे नमूद केले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एपस्टीन फाईल्स’वरून लक्ष भरकटवण्यासाठी इराणवर हल्ले सुरू केले आहेत. इराण हा भारताचा विश्वासू मित्र असूनही भारत आज त्याच्या पाठीशी उभा राहत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. कॅनडासारखा लहान देश अमेरिकेला नमत नाही, मग नरेंद्र मोदी का घाबरतात, असा सवाल त्यांनी केला.
१५ दिवसांचा अल्टिमेटम-
या आंदोलनाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी सरसंघचालकांना जाहीर आवाहन केले आहे. “मोहन भागवत यांनी येत्या १५ दिवसांत नरेंद्र मोदींना या सर्व प्रकरणांचा जाब विचारावा,” अशी मागणी त्यांनी केली.










