Not ‘Operation Tiger’, It’s ‘Operation Fadnavis’ -Uddhav Thackeray – उबाठातील सहा खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात कालपासून दौरा सुरू केला आहे. वाशीम – यवतमाळ, हिंगोलीनंतर त्यांनी आज परभणी, धाराशिव येथे त्यांनी संवाद मेळावे घेतले. परभणीत ते म्हणाले की, हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही, तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे. भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी सुरू आहे. जसे शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांचे पंख छाटले गेले, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही सुरू आहे. मराठवाडा दौऱ्यादरम्यान परळीत ठाकरेंचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत खा. संजय राऊत,अनिल देसाई,अरविंद सावंत, आ. अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, परभणीत आज अनेक दिवसांनी आलो आहे. सर्वप्रथम परभणीकरांचे आभार मानतो. तुम्ही शिवसेनेचा हक्काचा महापौर निवडून दिलात. तो जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.आता त्यावरूनही माझ्यावर टीका झाली. म्हणे मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, कारण महापौर मुस्लीम आहे. असेल मुस्लीम, पण तो आमचा शिवसैनिक आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेला आहे. ज्यांनी माझ्यावर टीका केली, त्यांना माझा प्रश्न आहे की, विधान परिषदेत तुम्ही ज्याला निवडून आणले, त्याची पार्श्वभूमी तपासणार का? त्याच्यावर कोणते गुन्हे होते, तो तुरुंगात गेला होता का, हेही जनतेसमोर आणा. एका बाजूला स्वतःच्या शेतातील पीक काढून महाराजांच्या कीर्तनासाठी जागा उपलब्ध करून देणारा आमचा महापौर आणि दुसऱ्या बाजूला तुमचा आमदार. मग जनतेनेच ठरवावे कोण बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहे.
तुम्ही शिवसैनिकांशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली, हा बाळासाहेबांच्या विचारांवरच घात आहे. मी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे आलो होतो. त्या वेळी स्टेडियम खचाखच भरले होते. पाऊस पडत होता, तरी लोक जागेवरून हलले नाहीत. त्या वेळी माझ्या एका बाजूला राहुल होता आणि दुसऱ्या बाजूला आज गद्दार झालेला खासदार होता. तेव्हा मला तो गद्दार आहे, हे माहिती नव्हते. मी दोघांचे हात वर केले. आज वाटते, राहुलने धरलेला हात बरोबर होता; दुसरा हात चुकीचा होता.हे म्हणतात विकासासाठी गेलो. कोणाच्या विकासासाठी? मतदारसंघाच्या की स्वतःच्या? आज त्यांचे खासगी विमानातील व्हिडिओ फिरत आहेत.

ठाकरे पुढे म्हणाले की, शेतकरी उपाशी आहे आणि हे विमानात बसून बदाम खात आहेत. एवढ्या बेशरमपणे व्हिडिओ टाकला की त्यात खरेदी-विक्री करणारे दलालही दिसत आहेत. एवढा पैसा कुठून आला? खासगी विमानाचा खर्च कोणी केला? याचे उत्तर त्यांनी द्यावे.माझ्यावर टीका होते की, उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे. मी म्हणतो, आत्मपरीक्षण फक्त मीच नाही तर सर्वांनी करावे. विशेषतः टीका करणाऱ्यांनी करावे. शिवसेना फुटीची केस चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याबद्दल कोणी आत्मपरीक्षण करत नाही. आता सहा खासदार पक्ष सोडून गेले. संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांनी लोकसभा अध्यक्षांना आधीच पत्र देऊन आमची बाजू ऐकण्याची विनंती केली होती.
अरविंद सावंत हे लोकसभा अध्यक्षांच्या आदेशाने कारगिल दौऱ्यावर गेले होते. तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा दौरा होता. तरी त्यांना मध्येच परत बोलावण्यात आले. लोकसभा अध्यक्षांनी आधी कारगिलला पाठवले आणि नंतर घाईघाईने दिल्लीला बोलावले. यावरून कोणाच्या दबावाखाली निर्णय घेतले जात आहेत, असा प्रश्न निर्माण होतो.लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. जनता आणि मतदार हाच खरा पक्ष असतो. दोन-तृतीयांश खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले म्हणून त्यांना कायदेशीर मान्यता मिळते, असे संविधानात कुठेही नाही. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनीही स्पष्ट सांगितले आहे की, लोकप्रतिनिधी स्वतः पक्ष विलीन करू शकत नाहीत. जर या देशात कायद्याचे राज्य असेल, तर हे सहाही खासदार अपात्र ठरले पाहिजेत. तरीही माझा लोकसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. त्यांनी घटनेप्रमाणे निर्णय घ्यावा. अधिकार आणि मर्जी यात फरक असतो. आम्ही अधिकार मानतो, मर्जी नाही.
मी लोकसभा अध्यक्षांना हात जोडून सांगतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा सन्मान राखा. इतिहासात निष्पक्ष अध्यक्ष म्हणून नोंद व्हावी, घटना मोडणारे अध्यक्ष म्हणून नाही.आजही परभणीत शेतकरी मला भेटले. गेल्या वर्षी अतिवृष्टीत त्यांचे पीक, घरे, संसार आणि जमिनी वाहून गेल्या. जमिनीवरील सुपीक माती वाहून गेली. आजही अनेकांना पीक विमा मिळालेला नाही. त्या वेळी मी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो. हा गद्दार कुठे होता? फक्त तोंड दाखवायला आला होता. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली होती.माझ्यावर आरोप होतो की मी लक्ष दिले नाही. हो, ती माझी चूक होती. लक्ष दिले असते तर यांची भानगड आधीच समजली असती. पण आता तुम्ही लक्ष द्या. तुम्ही मला जो चाबूक दिला, तो मी पुन्हा तुमच्याकडे देतो. हा गद्दारांविरोधात वापरण्याची जबाबदारी तुमची आहे. ज्यांना आपण प्रेम दिले, तेच माजले. प्रेमाची किंमत ज्यांना समजत नाही, तेच गद्दारी करतात.यांच्यापेक्षा आता कॉकरोच जनता पार्टी मोठी आहे आणि यांची बाबरी जनता पार्टी झाली आहे.

जर हे विकास निधीसाठी गेले असतील, तर आज लोकसभेत आमचे तीन आणि राज्यसभेत एक असे चार खासदार पुरेसे आहेत. आरएसएसला १०० वर्षे झाली. भाजप मोठा पक्ष असल्याचा दावा करतो. पण हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलला नसता, तर भाजप आजच्या उंचीवर पोहोचला नसता.आमचे हिंदुत्व वेगळे आहे. जो या देशाला आपला मानतो, तो मुस्लीम असला तरी आमचा आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे जय शिवराय, हर हर महादेव, जय श्रीराम आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला शेतमालाचा योग्य भाव मिळवून देणे.१९८७ मध्ये पार्ले पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेली. त्या निवडणुकीनंतर शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकारही काढून घेण्यात आला. तेव्हा भाजप गांधीवादी समाजवादाची भाषा करत होता. नंतर हिंदुत्वाच्या नावावर राजकारण सुरू केले.
बाबरी मशिद पाडल्यानंतर भाजपने जबाबदारी नाकारली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, “जर माझ्या शिवसैनिकांनी हे केले असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.” मुंबई दंगलीत हिंदूंचे संरक्षण करणारे शिवसैनिक होते. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात भाजपचा एकही कार्यकर्ता नव्हता; शिवसैनिकांवरच खटले होते.राम मंदिरासाठी शिवसेनेने चांदीच्या विटा दिल्या, मदत केली. पण भाजपने रामाच्या नावावर दुकान उघडले. हिंदुत्वाशी खरी गद्दारी त्यांनीच केली आहे.आजचे ऑपरेशन हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही, तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे. भाजपमध्येच अंतर्गत गटबाजी सुरू आहे. जसे शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांचे पंख छाटले गेले, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही सुरू आहे.
गद्दारांचा वापर होईल आणि नंतर त्यांना बाजूला केले जाईल. भाजपने त्यांना स्वतःच्या पक्षात घेतले नाही. दुसऱ्या पक्षातूनच ठेवले. कारण वेळ आली तर त्यांचा राजकीय वापर करता यावा, हा त्यामागचा डाव आहे.परभणीचा इतिहास असा आहे की, इथला मतदार शिवसेनेच्या उमेदवाराला भरभरून मतदान करतो. पण काही जण गद्दारी करतात. ही माझीही चूक आहे. मी तुमची माफी मागतो. आता ही चूक पुन्हा होऊ देऊ नका.२०२४ मध्ये तुम्ही मशाल चिन्ह आणि बाळासाहेबांच्या विचारांवर मतदान केले होते की मोदींच्या नावावर? महाराष्ट्राने मोदींच्या लाटेतही वेगळा कौल दिला. पण हे खासदार पुन्हा त्यांच्याच पायाशी जाऊन बसले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.मला परभणीत सर्व आमदार आणि खासदार शिवसेनेचे हवे आहेत. भगवा हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शिवसेनेचा आहे. त्या भगव्यावर कोणतेही चित्र लावू नका. मशाल हे फक्त चिन्ह नाही, तर गद्दारीविरोधात पेटलेली ज्वाला आहे. ती प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात धगधगत राहिली पाहिजे.तुमच्या हृदयातील निष्ठेची ही मशाल गद्दारी जाळून खाक करेल, असा मला विश्वास आहे.
शिंदे सेनेनेही ताकद दाखवली
उद्धव ठाकरे परभणीत असताना शिंदे गटात दाखल झालेले बंडखोर खा. संजय जाधव यांनी पाथरी येथे आमदार सईद खान यांच्या पुढाकारातून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा अनधिकृत असल्याची माहिती आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचा परभणी दौरा आणि त्याचवेळी संजय जाधव यांचा पाथरीतील कार्यक्रम यामुळे जिल्ह्यात एकाच दिवशी दोन्ही गटांकडून राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली. यावेळी संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अशी अवस्था खा. संजय राऊत यांच्यामुळे झाल्याचा आरोप केला.










