Ashok Kharat : नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या महिला लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज खरातची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने आरोपी खरात याला २९ मार्च २०२६ पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. या वाढीव कोठडीमुळे पोलीस तपासाला आता अधिक वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारी पक्षाचा सडेतोड युक्तिवाद-
आजच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर तपासातील प्रगतीचा अहवाल सादर केला. खरातने केवळ महिलांचे शारीरिक शोषणच केले नाही, तर ‘ईशानेश्वर’ मंदिराच्या नावाखाली भाविकांची मोठी आर्थिक फसवणूकही केली असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले. या प्रकरणाचे धागेदोरे अत्यंत खोलवर पसरलेले असून, आरोपीच्या आश्रमातून जप्त करण्यात आलेली संशयास्पद साधने, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेणे अद्याप बाकी आहे. तपासाचा हा व्यापक परीघ लक्षात घेता, आरोपीला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवणे अनिवार्य असल्याची विनंती अभियोग पक्षाने केली होती.
अशोक खरातच्या पापांचा पाढा: रिव्हॉल्व्हर, काडतुसे आणि नरबळीचा संशय; ‘एसआयटी’ने न्यायालयात मांडले खळबळजनक वास्तव-
आज खरातची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी, खबरदारीचा उपाय म्हणून त्याची जिल्हा रुग्णालयात रीतसर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य आणि जनसामान्यांमधील संताप लक्षात घेता, जिल्हा न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या सुनावणीवेळी वकिलांसह सर्वसामान्यांचीही मोठी गर्दी उसळली होती.
एसआयटीचा धक्कादायक खुलासा: महिलांचे जाणीवपूर्वक शोषण-
विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी सुनावणीदरम्यान तपासातील अत्यंत धक्कादायक माहिती न्यायालयासमोर मांडली. खरात हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी गूढ पद्धतींचा वापर करत असे. महिलांना विशेष ‘खडे’ किंवा ‘पेढे’ दिले जात असत. इतकेच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यात काही गुंगीकारक किंवा संशयास्पद पदार्थ मिसळून त्यांना प्यायला दिले जात असे. हे पदार्थ सेवन केल्यावर संबंधित महिलांना शारीरिक अस्वस्थता जाणवू लागे आणि याच हतबलतेचा फायदा घेऊन खरात त्यांच्यावर अत्याचार करत असे, असा थेट आरोप एसआयटीने केला आहे.
रिव्हॉल्व्हर, रोकड आणि राजमुद्रेचा अनाधिकृत वापर-
सरकारी वकिलांनी न्यायालयात तपासादरम्यान हस्तगत केलेल्या वस्तूंचा तपशील सादर केला. खरातच्या ठिकाणांहून ६ लाख ५३ हजार रुपयांची रोकड आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, त्याच्याकडे एक काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर सापडले असून, त्यावर ‘राजमुद्रा’ कोरलेली आहे. या शस्त्रासोबतच ३१ जिवंत काडतुसे सापडली आहेत, त्यापैकी ५ काडतुसे वापरली (फायर) गेली आहेत. ही पाच गोळीबार कुठे आणि कोणावर करण्यात आले, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
नरबळीचा संशय आणि विकृत मानसिकतेवर ताशेरे
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एका अत्यंत भीतीदायक शक्यतेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. खरातच्या आश्रमातील गूढ हालचाली आणि मिळालेली शस्त्रे पाहता, तिथे ‘नरबळी’ दिला गेला असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दिशेनेही आता तपास केला जाणार आहे. तसेच, ६७ वर्षीय खरात हा आपल्या मुलीच्या वयाच्या ३० वर्षांच्या युवतींचे लैंगिक शोषण करत होता, यावरून त्याची विकृत मानसिकता स्पष्ट होते, असे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या कृत्यामुळे समाजाच्या नैतिकतेला मोठी तडे गेले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘सिद्ध पुरुष’ असल्याचा बनाव आणि वन्यजीव कायद्याचे उल्लंघन-
नाशिक जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने खरातच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले असून, त्याने केवळ मानवी नव्हे तर वन्यजीव कायद्याचेही (Wildlife Protection Act) उल्लंघन केल्याचा प्रबळ संशय व्यक्त केला आहे.
भय आणि भ्रमाचे जाळे: वन्यजीव अवयवांचा वापर-
सरकारी वकिलांनी न्यायालयात माहिती देताना सांगितले की, खरात हा भाविकांच्या मनात स्वतःबद्दल अफाट आदर आणि भीती निर्माण करण्यासाठी रानटी प्राण्यांचा वापर करत असे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्याने जिवंत किंवा बनावट साप आणि वाघांच्या कातड्याचा वापर करून ‘दैवी प्रचिती’ येत असल्याचा आभास निर्माण केला. इतकेच नव्हे तर, अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी ‘कस्तुरी’ आणि इतर प्रतिबंधित वन्यजीव वस्तू त्याच्याकडे सापडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणात आता वनविभागाच्या कायद्यानुसारही कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. लोकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांना संमोहित करणे आणि त्यानंतर त्यांचे शोषण करणे, हीच खरातची मुख्य पद्धत असल्याचे अभियोग पक्षाने नमूद केले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद: “तपास पूर्ण झाला आहे”-
दुसरीकडे, आरोपी अशोक खरातच्या वतीने बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीला तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, गेल्या सात दिवसांपासून आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या काळात पुरेसा तपास करण्यात आला आहे. तपासासाठी आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य पोलिसांनी आधीच हस्तगत केले आहे. त्यामुळे, तपासाच्या नावाखाली आरोपीला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याची कोणतीही कायदेशीर आवश्यकता उरलेली नाही. पुढील तपास हा आरोपीला ‘न्यायालयीन कोठडी’ (Magisterial Custody) देऊनही चालू ठेवता येईल, असे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यायालयाचा कल आणि तपासाची दिशा
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. केवळ कागदोपत्री पुरावे गोळा करणे पुरेसे नसून, खरातने कोणाकोणाचे आणि कशा प्रकारे शोषण केले आहे, याची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. विशेषतः वन्यजीव कायद्याचे उल्लंघन आणि कथित ‘सिद्ध पुरुष’ असल्याचा बनाव करून केलेली आर्थिक लुटमार या बाबी अधिक चौकशीची मागणी करत होत्या. परिणामी, न्यायालयाने तपासासाठी आरोपीला पुन्हा पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला.
अशोक खरातचा न्यायालयात बचावाचा पवित्रा; “साप आणि वाघाबद्दल मला काहीच माहिती नाही-
आज झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती अत्यंत मोठी असल्याचे सांगत, अनेक महत्त्वाच्या बाबींचा तपास अद्याप बाकी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दुसरीकडे, आरोपी खरातने मात्र स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावत न्यायालयात अनभिज्ञता व्यक्त केली आहे.
सरकारी पक्षाचा ठाम पवित्रा आणि तपासाची व्याप्ती-
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, खरातने स्थापन केलेल्या ईशानेश्वर मंदिरात होणारे गूढ विधी आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांचे मोठे जाळे अद्याप पूर्णपणे उघड झालेले नाही. भाविकांकडून जमा केलेला पैसा कोठे वळवण्यात आला आणि त्यामागे कोणते मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध घेणे अनिवार्य आहे. केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर श्रद्धेच्या नावाखाली चालवलेला हा ‘धंदा’ रोखण्यासाठी आणि सर्व पीडितांना समोर आणण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अभियोग पक्षाने केले.
न्यायाधीशांपुढे अशोक खरातचा कानावर हात
पोलीस कोठडी सुनावण्यापूर्वी न्यायमूर्तींनी प्रथेप्रमाणे अशोक खरातला “तुला काही सांगायचे आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर खरातने अतिशय सावधपणे आपली बाजू मांडली. “मला साप, वाघ किंवा कोणत्याही प्राण्यांच्या कातड्याविषयी काहीही माहिती नाही. हे सर्व मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” असे विधान त्याने न्यायालयात केले. मंदिरात आपल्या उपस्थितीबाबत सांगताना तो म्हणाला की, तो दररोज तिथे जात नसे. केवळ महाशिवरात्री किंवा श्रावणी सोमवार यांसारख्या विशेष सणांच्या वेळीच तो मंदिरात जात असे आणि त्यावेळी तिथे १०० च्या आसपास भाविक असायचे. खरातने पुढे असा दावा केला की, गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास अधिकाऱ्यांनी जे काही प्रश्न विचारले, त्या सर्वांची त्याने उत्तरे दिली आहेत.










