Ajit Pawar Accident Case: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे गूढ आता अधिक गडद होताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि वेगाने होत नसल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी थेट कर्नाटक पोलिसांत धाव घेतली आहे. महाराष्ट्रात तक्रार नोंदवून घेण्यास नकार मिळाल्यानंतर, रोहित पवार यांनी बंगळुरू येथील पोलीस ठाण्यात ‘झिरो FIR’ दाखल केला असून, मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रात न्याय मिळेना, म्हणून कर्नाटकचा आधार
रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या दीड महिन्यापासून आम्ही महाराष्ट्रात विविध ठिकाणी एफआयआर (FIR) दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. “सीआयडी नेमका काय तपास करत आहे, हे कोणालाच माहीत नाही. अजितदादांच्या पक्षातील नेत्यांना वारंवार स्मरणपत्रे देऊनही उत्तरे मिळत नाहीत,” असे ते म्हणाले.
अखेर कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेत तक्रार नोंदवून घेतली आहे. आता कर्नाटकचे डीजी (DG) हे प्रकरण महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवतील आणि तिथून हा तपास बारामती पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जाईल.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल (सोमवार, दि. २३ मार्च) कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने FIR दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला, याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी… pic.twitter.com/Ne9Ednjd5k
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 24, 2026
“अजितदादांची ताकद हिरावण्यासाठी काळी जादू”
या पत्रकार परिषदेतील सर्वात धक्कादायक विधान रोहित पवार यांनी ‘काळ्या जादू’बाबत केले. ते म्हणाले की, “अजितदादा जिवंत असताना त्यांच्या बारामतीतील घराबाहेर आणि मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर ‘ब्लॅक मॅजिक’ करण्यात आले होते, हे सर्वांनी पाहिले आहे. पक्षातील काही नेत्यांनी आपली पदे टिकवण्यासाठी किंवा दादांची ताकद स्वतःकडे खेचून घेण्यासाठी भोंदूबाबांचा आधार घेतला होता का? त्यांच्याच पक्षातील कोणत्या नेत्यांनी आपल्या करंगळी आणि अंगठ्याला कापून ही काळी जादू केली, हे समोर आले पाहिजे.”
जय पवार गप्प का? रोहित पवारांचा सवाल
अजित पवारांचे चिरंजीव जय पवार अद्याप या विषयावर जाहीरपणे का बोलत नाहीत, असा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केला. “वडील गेल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जय पवार यांनी पुढे यायला हवे. कदाचित सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या दबावामुळे ते पत्रकार परिषद घेत नसावेत,” असा संशय त्यांनी व्यक्त केला. जय पवार जोपर्यंत आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत माझ्याकडे असलेले महत्त्वाचे पुरावे मी जाहीर करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या पक्षातीलच काही महत्त्वाकांक्षी नेत्यांना मोठे पद हवे होते, त्यातूनच हा सर्व प्रकार घडला का, अशी शंका आता रोहित पवारांच्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.











