Home / महाराष्ट्र / Dadar-Ratnagiri Passenger: कोकणवासियांचा हक्काचा प्रवास रेल्वेने हिरावला! रत्नागिरी पॅसेंजरच्या जागी आता ‘दादर-गोरखपूर एक्सप्रेस’; मनसे आक्रमक

Dadar-Ratnagiri Passenger: कोकणवासियांचा हक्काचा प्रवास रेल्वेने हिरावला! रत्नागिरी पॅसेंजरच्या जागी आता ‘दादर-गोरखपूर एक्सप्रेस’; मनसे आक्रमक

Dadar-Ratnagiri Passenger: मुंबई आणि कोकणला जोडणारी हक्काची ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ रेल्वे प्रशासनाने कायमची बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे,...

By: Team Navakal
Dadar-Ratnagiri Passenger
Social + WhatsApp CTA

Dadar-Ratnagiri Passenger: मुंबई आणि कोकणला जोडणारी हक्काची ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ रेल्वे प्रशासनाने कायमची बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या गाडीच्या वेळेत आता ‘दादर-गोरखपूर एक्सप्रेस’ चालवली जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत असून, संपूर्ण कोकणवासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता थेट रेल्वे प्रशासनाला शिंगावर घेतले आहे.

महाराष्ट्रातील गाड्यांना ‘कात्री’, परराज्यातील गाड्यांना ‘हिरवा कंदील’

कोरोना काळापासून रेल्वे प्रशासनाने राज्यांतर्गत धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या बंद केल्या आहेत. यामध्ये मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस आणि पुणे-भुसावळ पॅसेंजर यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या पुन्हा सुरू करण्याऐवजी त्याच वेळेत परराज्यात जाणाऱ्या गाड्या सोडल्या जात आहेत. आता रत्नागिरी पॅसेंजरच्या जागी गोरखपूर गाडी सुरू करून रेल्वेने कोकणवासियांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

मनसेचे शिष्टमंडळ रेल्वे दरबारी

मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला तीव्र निषेध नोंदवला. नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे आणि रेल्वे कर्मचारी सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांशी चर्चा केली. “राज्यातील जनतेला गृहीत धरून वारंवार केला जाणारा हा दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका मनसेने मांडली आहे.

आंदोलनाचा इशारा

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करावी आणि यापूर्वी रद्द केलेल्या सर्व राज्यांतर्गत गाड्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. जर रेल्वे प्रशासनाने यावर तत्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर स्थानिक जनतेचा असंतोष उफाळून येईल आणि रेल्वेला तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मध्य रेल्वेने कोकणवासियांच्या भावनांची दखल घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा मुंबई आणि कोकणात रेल्वे प्रशासनाविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या