Dhurandhar Controversy: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अभिनेता आर माधवन याच्या एका दृश्यामुळे शिख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या दृश्यात माधवनचे पात्र पवित्र ‘दशम ग्रंथ’ मधील श्लोक म्हणत असताना धूम्रपान करत असल्याचे दाखवण्यात आले होते. या वाढत्या वादानंतर आता खुद्द आर माधवनने सोशल मीडियाद्वारे आपली बाजू मांडली आहे.
“ती केवळ एक गैरसमजूत”: आर माधवन
माधवनने एक व्हिडिओ संदेश जारी करून प्रेक्षकांचे आभार मानले आणि या वादावर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “ही थोडी गैरसमजूत आहे. मला पूर्ण खात्री आहे की, तो संवाद म्हणण्यापूर्वी दिग्दर्शक आदित्य धर यांनी माझी विशेष काळजी घेतली होती. त्यांनी मला स्पष्ट सांगितले होते की, ही ओळ म्हणण्यापूर्वी सिगारेट विझवायची आहे. त्यामुळे जेव्हा मी तो पवित्र श्लोक म्हणतो, तेव्हा माझ्या हातात सिगारेट नाही, तोंडातून धूर निघत नाहीये आणि स्क्रीनवर कुठेही धूर दिसत नाहीये.”
धार्मिक भावनांचा आदर
माधवनने पुढे स्पष्ट केले की, चित्रपटाची संपूर्ण टीम धार्मिक भावनांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. त्याने शिख समुदायाबद्दल नितांत आदर व्यक्त करताना सांगितले की, “आमच्यासाठी हे शब्द अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहेत. मी स्वतः प्रत्येक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी जातो, त्यामुळे आमच्या हेतूवर शंका घेऊ नका.”
जरी त्या दृश्याच्या सुरुवातीला त्याचे पात्र धूम्रपान करताना दिसत असले, तरी प्रत्यक्ष श्लोक पठणावेळी ही कृती थांबवण्यात आली होती, असे अभिनेत्याने अधोरेखित केले.
‘धुरंधर’मध्ये कलाकारांची मांदियाळी
आदित्य धर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट एका हेराच्या प्रवासावर आधारित आहे. यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून तो ‘हमझा अली मझारी’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटात आर माधवनसोबतच अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.











