Ashok Kharat : अध्यात्माच्या बुरख्याखाली महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या पाखंडी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात आता उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटुंबांतील महिलाही त्याच्या जाळ्यात अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने पीडित महिलांना धीर देण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी विशेष ‘हेल्पलाईन क्रमांक’ जारी केला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कठोर इशारा-
या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. “अशोक खरात याच्या विरोधात सर्व आवश्यक आणि ठोस पुरावे उपलब्ध आहेत,” असे गृमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. खरातने केलेल्या कृत्यांची व्याप्ती मोठी असून, त्याला कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या विधानामुळे पोलीस प्रशासनावरचा दबाव वाढला असून, तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.
पीडित महिलेचा हृदयद्रावक जबाब: शोषणाची पद्धत उघड
खरात महिलांना कशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढायचा, याची सविस्तर माहिती एका पीडित महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीतून समोर आली आहे. (पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे).
अंधश्रद्धेचा मायाजाल: लग्नाचे आमिष आणि ‘चमत्कारी’ खड्यांच्या नावाखाली लूट; भोंदू अशोक खरातच्या फसवणुकीचा पाढा
स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याने केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आर्थिक स्तरावरही महिलांची कशी फसवणूक केली, याचे जळजळीत वास्तव एका पीडित तरुणीच्या जबाबातून समोर आले आहे. उच्चशिक्षित असूनही परिस्थितीच्या फेऱ्यात अडकलेल्या या तरुणीला खरातने आपल्या अंधश्रद्धेच्या जाळ्यात कसे ओढले, याचा थरार आता उघड झाला आहे.
या महिलेची तक्रार तिच्याच शब्दात देण्यात आली आहे-
माहे जुलै २०२१ मध्ये मला एक लग्नाचे स्थळ आले होते. त्या स्थळाबद्दल अशोककुमार बाबांना विचारण्याकरीता मी माझ्या जीजुसोबत अशोककुमार बाबांच्या ऑफिसमध्ये गेले. तेथे गेल्यावर अशोककुमार बाबांनी मला एक काळया रंगाचा खडा गळयात पेंडेंट बनवून घालण्यासाठी दिला. सदरचा खडा गळयात घातल्यास तुला मागणी केलेल्या मुलासोबत तुझे लग्न जुळेल. जर हा खडा तू गळयात घातला नाहीस व घातल्यानंतर काढून टाकलास, तर तुझे ठरलेले लग्न मोडेल, असे अशोककुमार बाबांनी मला सांगितले. त्याप्रमाणे मी अशोककुमार बाबांनी दिलेला काळा खडा पेंडेंट बनवून गळयामध्ये घातला. त्यानंतर माहे जुलै २०२१ मध्ये माझा साखरपुडा झाला. परंतु त्या दरम्यान मी एमएससीचे शिक्षण घेत असल्याने कॉलेजला गेल्यावर अशोककुमार बाबांनी दिलेला खडा मी गळ्यातून काढून ठेवायला लागले.
माझा साखरपुडा झाल्याने खडयाची गरज नसल्याचे मला वाटले. त्यामुळे अशोककुमार बाबांनी दिलेला खडा कॉलेजला गेल्यावर मी काढून ठेवत असे. त्यानंतर एक आठवड्यानंतर माझ्या होणा-या सासरच्या लोकांनी लग्न करण्यास नकार देऊन लग्न मोडले. तेंव्हा मला व माझ्या घरच्यांना धक्काच बसला. तेंव्हा माझा अशोककुमार बाबांवर विश्वास बसू लागला. अशोककुमार बाबांनी दिलेला खडा भी काढल्यामुळेच माझे लग्न मोडले असा माझा समज होवून अशोककुमार बाबांच्या बोलण्यावर माझा अंधविश्वास बसला, त्यानंतर त्या महिन्यात मी पुन्हा माझ्या जीजुसोबत अशोककुमार बाबांच्या ऑफिसला गेले. अशोककुमार बाबांच्या ऑफिसला गेल्यावर बाबांना लग्न मोडल्याचे सांगितले व मी कॉलेजला गेल्यावर गळ्यातून खडा काढून ठेवत होते, असेही त्यांना सांगितले.
तेंव्हा बाबांनी सांगितले की, तू काळजी करू नको, मी तुला पुष्कराज नावाचा खडा देतो, तो खडा तू खंडोबाच्या मंदिरात जावून खंडोबाला ११ नारळ अर्पण करून गळयात पेंडेंट बनवून घाल, तुझे चांगल्या ठिकाणी लग्न जुळेल, तू माझ्या मुलीसारखी असून तुझे कन्यादान मी स्वतः करेन, असे अशोककुमार बाबांनी मला सांगितले. त्यानंतर अशोककुमार बाबांनी त्यांचे टेबलच्या ड्रॉवर मधून एक फिक्कट रंगाचा खडा काढून टेबलावर ठेवला व काहीतरी मंत्र पुटपुटले. त्यानंतर बाबांनी तो खडा मला गळयात घालण्यासाठी दिला.
सदरचा खड़ा मी सिध्द करून तुला दिला असून हा घातल्यावर तुझे कल्याण होईल असे बाबांनी मला सांगितले व तो खड़ा मला दिला. सदरचा खडा दुर्मिळ असल्याचे सांगून बाबांनी आमचेकडे ५० हजार रू मागितले, तेव्हा माझे जीजुनी बाबांना ५० हजार रोख दिले, अशोककुमार बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी एका खंडोबाच्या मंदिरात जावून बाबांनी सांगितलेल्याप्रमाणे ११ नारळ खंडोबास अर्पण करून बाबांनी दिलेला खडा गळयात घातला.
त्यानंतर माहे नोव्हेंबर २०२२ पर्यंत मला लग्नासाठी वेगवेगळी स्थळे येवू लागली. जी स्थळे आम्हाला आवडत होती, त्या स्थळांबाबत मी व माझे जीजु असे बाबांच्या ऑफिसमध्ये जावून त्यांचेबाबत बाबांना विचारत होतो. परंतु बाबा ही स्थळे योग्य नसल्याचे सांगत होते. माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये एक स्थळ आले. मुलाकडील लोकांनी मला लग्नासाठी मागणी घातल्यानंतर पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलाला मी व मला मुलगा पंसत पडला. त्यानंतर लग्नाची बोलणी करण्याचे ठरले. तेंव्हा माझे जीजुंनी लग्नास मागणी घातलेल्या मुलास अशोककुमार खरात बाबांबद्दल सांगितले व आशिर्वादाकरिता त्यांचे ऑफिसमध्ये जावू असे सुचविले. त्यानंतर पाच दिवसांनी मी, माझे जीजु तसेच माझे होणारे पती असे आम्ही अशोककुमार बाबांच्या ऑफिसमध्ये गेलो.
अशोकुमार बाबांचे ऑफिसमध्ये गेल्यावर बाबांनी सदरचा मुलगा हा तुझ्या साठी योग्य असल्याबाबत सांगितले. तसेच साखरपुडा झाल्यानंतर एका मंदिरात तुझ्या आणि तुझ्या होणा-या पतीच्या हातून सिध्दपुजा करावी लागेल असे बाबांनी मला सांगितले. बाबांवर आमचा पूर्ण विश्वास बसलेला असल्याने मी तसेच माझे होणारे पती यांनी मंदिशत पुजा करण्याचे ठरविले. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्येच माझा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यावर अशोककुमार खरात या बाबांचा आशिर्वाद घेण्याकरीता मी व माझे होणारे पती व माझे जीजु असे आम्ही बाबांच्या ऑफिसमध्ये गेलो. तेथे गेल्यावर बाबांगी मला ब्राउन रंगाचा खडा व माझे होणारे पर्तीसाठी हिरव्या रंगाचा खडा पंचधातुच्या अंगठीमध्ये घालण्याकरीता दिला. त्या खडयांचे प्रत्येकी १४ हजार रु असे एकुण २८ हजार रू बाबांनी माझेकडून व माझे होणा-या पतींकडून घेतले.
त्यानंतर एक आठवडयानंतर बाबांनी फोन करून मंदिरात करावयाच्या विधीबाबत चर्चा करायची असल्याचे सांगून मला ऑफिसमध्ये येण्याबाबत सांगितले. माझे जीजु हे काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने व माझी बहीण आजारी असल्याने घरातील कोणीही माझेसोबत येवू शकले नाही. तसेच माझे पती देखील कामात व्यस्त असल्याने बाबांनी बोलविल्याप्रमाणे मी त्यांचे ऑफिसमध्ये एकटीच गेली. ऑफिसमध्ये गेल्यानंतर अशोकुमार बाबांनी मला त्यांचे चेंबरमध्ये बोलावून घेतले. बाबांनी चेंबरमध्ये बोलविल्यावर मला खुर्चीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर बाबांनी मला प्रसाद म्हणून अगोदर पेढा खायला दिला. त्यानंतर मला त्यांनी एका तांब्याच्या भांडयात असलेले पाणी ग्लासमध्ये पिण्यास दिले.
पाणी पिल्यानंतर मला त्या पाण्याची चव खारट व कडवट लागली. पाणी पिल्यानंतर मला गरगरल्यासारखे व मळमळल्यासारखे वाटू लागले. तेंव्हा बाबांनी मला सांगितले की, हे पाणी तू जितके जास्त प्रमाणात घेशील तितके तुला जास्त शुभ फळ भेटेल. असे बोलून बाबांनी मला पाणी पिलेला ग्लास डोक्यावर धरून उभे राहण्यास सांगितले व डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी ग्लास डोक्यावर धरून उभी राहिली व डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणू लागले. त्यानंतर बाबांनी त्यांचे ऑफिसमधील लाईट बंद केली, त्यानंतर अशोककुमार बाबा माझे पाठीमागे येवून उभे राहिले व गायत्री मंत्र म्हणू लागले. त्यांनी मला डोळे बंद करून उभे राहण्यास व मंत्रोच्चार थांबविण्यास सांगितले.
त्यानंतर बाबांनी माझे अंगाला स्पर्श करण्यास सुरुवात केली व तुला या ठिकाणी दोष आहे असे बोलून अंगावरील सर्व ठिकाणी बाबा स्पर्श करू लागले. त्यानंतर बाबांनी मला पाठीमागून मिठी मारली , तसेच माझे पाठीमागील अंगावर चुंबन घेवडा लागले. त्यावेळी मी बाबांना दूर लोटण्याचा प्रयत्न करून तसे करण्यास नकार दिला. तेंव्हा बाबांनी मला सांगितले की, मी श्रीकृष्णाचा अवतार असून तू माझी त्या जन्मातील राधा आहेस, या जन्मात देखील तू माझी प्रेयसी म्हणून रहा. असे बोलून बाबांनी मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी बाबांना नकार देवून दूर ढकलले. परंतु बाबांनी मला पेढा व कडवट व खारट पाणी पिण्यास दिले होते, पेढा खाल्ल्यामुळे व पाणी पिल्यामुळे माझे डोके जड झाले होते व बाबांचे प्रत्येक बोलणे मला त्यांचेकडे वश करत आहे असे वाटत होते.
त्यांचे बोलण्यामुळे मी त्यांचे मानसिक प्रभावाखाली येत असल्याचे व त्यांचे म्हणण्याप्रमाणे ऐकण्यास भाग पडत असल्याचे मला जाणवत होते. डोके जड झाल्यानंतरही मी अशोककुमार बाबांना नकार देत राहिले, तेंव्हा बाबांनी मला धमकी दिली की, जर तू माझ्यासोबत प्रेयसी म्हणून राहिली नाहीस तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होऊन तुझे पुन्हा लग्न मोडेल. तसेच माझेतील दिव्यशक्ती मी तुला याद्वारे देवून एकप्रकारे मी तुला पवित्र करीत आहे, त्यास तू नकार दिल्यास तुझे लग्न तर मोडेलच, आणि तुझा होणारा नवरा देखील मरून जाईल व तुझे लग्न देखील होणार नाही. अशी बाबांनी भिती घातल्याने त्या भितीने मी त्या दिवशी बाबांना काहीएक प्रतिकार करू शकले नाही.
त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये माझे जीजूंनी घरी येवून अशोकुमार बाबांनी मंदिरात करायला सांगितलेली पूजा करावी लागेल, नाहीतर पुन्हा अडचणी येतील, असे सांगितल्याने घरच्यांच्या संमतीने मी, माझे जीजु व माझे होणारे पती असे आम्ही मंदिरात जावून अशोकुमार बाबांनी सांगितल्याप्रमाणे पुजा केली. त्यानंतर एक आठवडयानंतर माझे लग्न झाले.
त्यानंतर माहे जानेवारीचे शेवटच्या आठवडयात बाबांनी माझ्या पतींना फोन वरून जोडीने आशिर्वाद घेण्यासाठी त्यांचे ऑफिसमध्ये बोलविले. त्यानंतर मी व माझे पती असे आम्ही बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी त्यांचे ऑफिसमध्ये गेलो. तेथे गेल्यावर आम्ही दोघे बाबाच्या पाया पडलो. त्यानंतर बाबांनी माझ्या पतींचा व माझा तळहात बघितला, व काहीतरी मंत्र पुटपुटुन आम्हाला सांगितले की, लग्नामध्ये तुम्हाला खूप लोकांची नजर लागलेली असून तुम्हाला लागलेला नजरदोष दूर करावा लागेल. नजरदोष दूर केला नाही तर तुझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे, असे बाबांनी सांगून त्यानंतर बाबांनी एक प्लॅस्टिकची भरलेली पाणी बॉटल आम्हाला दिली व तीन दिवस बेडरूममध्ये ठेवण्यास सांगितली, जर ते पाणी काळे झाले तर तुम्हाला लागलेली नजर दूर होईल, पाणी काळे झाल्यास ते पाणी वडाच्या झाडाजवळ ओतण्यास बाबांनी आम्हाला सांगितले. तसेच बेडरूममधील बेडच्या खाली जमिनीवरील माती किंवा धुळ किंवा कचरा घेवून येण्यास सांगितले, त्यानंतर अशोकुमार खरात बाबांनी माझे पतींना सांगितले की तुम्ही चेंबरच्या बाहेर जा, मला तिला ध्यानस्थ करून तिच्यासाठी प्रार्थना करावयाची आहे, असे बाबांनी सांगितल्यावर व बाबांवर माझे पतींचाही विश्वास बसलेला असल्याने माझे पती अशोकुमार बाबांच्या चेंबरच्या बाहेर गेले.
अशोकुमार बाबांच्या चेंबरमधील बाहेरून आतमधील काहीएक दिसत नसल्याने बाबांनी माझे पती बाहेर गेल्यावर मला चेंबरच्या दरवाजाचे लॅच लॉक करण्यास सांगितले. त्यानंतर बाबांनी मला तांब्याच्या भांडयात असलेले पाणी पिण्यास दिले. पुर्वीप्रमाणे पिण्यास दिलेल्या पाण्याचे चवीप्रमाणेच त्या पाण्याची चव पुन्हा खारट व कडवट लागली. पाणी पिल्यानंतर मला गरगरल्यासारखे व मळमळल्यासारखे झाले, तेंव्हा देखील बाबांनी मला सांगितले की, हे पाणी तू जितके जास्त प्रमाणात पिणार तितके तुला जास्त शुभ फळ भेटेल. असे बोलून मला पाणी पिलेला ग्लास पुर्वीप्रमाणेच डोक्यावर ठेवून उभे राहण्यास सांगितले व डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी ग्लास डोक्यावर ठेवून उभी राहिले व डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणू लागले, त्यानंतर माझे डोके जड होवू लागले, बाबांनी त्यांचे ऑफिसमधील लाईट बंद करून माझे पाठीमागे येवून मंत्र म्हणू लागले.
त्यानंतर बाबांनी मला पाठीमागून मिठी मारून माझे अंगावर चुंबन घेण्यास आणि मी श्रीकृष्णाचा अवतार असून तू माझी राधा आहेस, असं सारखं माझ्या कानाजवळ बोलून मला मोहीत केले. त्यानंतर बाबांनी माझ्या वर लैंगिक अत्याचार केले . मी बाबांना नकार देत होते, परंतु बाबांनी दिलेल्या धमकीमुळे मी आरडाओरड करू शकत नव्हते. बाबांनी माझेवर माझी इच्छा नसतांना डोके जड पडेल असे द्रव्य पिण्यास देवून मला संमोहीत करून त्यादिवशी माझ्यावर बलात्कार केला. त्यादिवशी बाबांनी मला कोणास काही एक सांगितल्यास मी तुला आणि तुझ्या नव-याला जीवानिशी ठार मारेन, त्या भितीने व बाबांवर लोकांचा खूप विश्वास असल्याने माझे कोणीही ऐकून घेणार नाही या विचाराने मी त्याबाबत कोणास काहीएक सांगितले नाही.
मी लग्नानंतर शिक्षण सुरू ठेवले होते. तेंव्हा अशोककुमार बाबांनी मला फोन करून प्रत्येक परिक्षेचे अगोदर माझेकडे आशिर्वाद घेण्यासाठी तुला यावे लागेल, नाहीतर मी तुझ्या नव-याला तू बाहेरख्याली आहे असे सांगून तुझे आयुष्य बरबाद करेन, अशाप्रकारे मला सतत धमकी देवून त्यांचे ऑफिसमध्ये बोलावून घेत माझेवर वारंवार बलात्कार केले. अशोककुमार बाबा माझ्यासोबत जे करत होते ते मी माझ्या इच्छेविरूध्द करत होते. बाबा मला व माझ्या नव-याला ठार मारतील व बदनामी करतील या भितीपोटी मी कोणास काहीएक सांगू शकत नव्हते.
नंतर अशोकुमार बाबांनी माझ्या पतींना फोन केला आणि आम्हाला दोघांना ऑफिसमध्ये आशिर्वाद घेण्यासाठी बोलवून घेतले. बाबांनी यापुर्वीच मला धमकी दिलेली असल्याने मी माझे पतीसोबत बाबांचे ऑफिसमध्ये आशिर्वाद घेण्यासाठी गेले. ऑफिसमध्ये गेल्यावर बाबांनी नेहमीप्रमाणे माझे पती जयंत यांना माझी ध्यानधारणा करून प्रार्थना करावयाची आहे असे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. माझे पती बाहेर गेल्यावर बाबांनी यापुर्वी मला दिलेल्या धमकीमुळे इच्छा नसतांना देखील चेह-यावर हास्य ठेवून अशोकुमार बाबा जसे सांगतील तसे केले. त्या दिवशी बाबांनी मला टेबलवर बसवून माझेशी संभोग केला.
त्यानंतर अशोककुमार खरात बाबा हे भोंदुबाबा असुन तो तंत्र मंत्राव्या नावाखाली व धार्मिक आस्थेच्या नावाखाली स्त्रीयांना त्यांचे आप्तजनांच्या जीवाची भिती घालुन त्यांचे लैंगिक शोषण करतात याबाबत माझ्या जीजुंना लोकांकडुन समजले असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मला विश्वासात घेवून तुझ्यासोबत बाबांनी असे काही केले आहे का याबाबत विचारले. सुरूवातीला मी खूप घाबरले. परंतु माझे जीजुंनी मी तुझ्या पाठीशी उभा राहीन, तू कोणतीही काळजी करू नको, तुझ्यावर अत्याचार झाले असतील तर आपण त्या नराधमाविरुध्द पोलीसात तक्रार करू, अस सांगितल्याने मी खूप हिंमतीने माझेसोबत अशोककुमार खरात या बाबांनी मला सुरूवातीला गुंगीकारक पदार्थ व चव नसलेले खारट व कडवट नशायुक्त पाणी पिण्यास देवुन मला माझे पतीच्या जीवाची भिती घालुन व जीवे ठार मारण्याची धमकी देतुन माझी इच्छा नसतांना माझेवर वारंवार बलात्कार केले असल्याचे मी माझे जीजुंना सांगितले. माझे जीजुंनी मला धीर दिल्याने मी अशोकुमार खरात उर्फ कॅप्टन या मांत्रिक बाबाविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.











