Narahari Jirwal viral video – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री (Food and Drug Administration Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar faction) चे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांच्याशी संबंधित एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे झिरवाळ यांच्यावर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित होत असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची (resignation) मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत (transgender person )शासकीय निवासस्थानी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. खोलीत मद्य व खाद्यपदार्थही दिसत असल्याची चर्चा आहे. मात्र, या व्हिडीओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, त्यातील दाव्यांची सत्यता तपासली जाणे आवश्यक आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या व्हिडीओची माहिती झिरवाळ यांना आधीपासूनच होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याचेही सांगितले जाते. मात्र, या चर्चेनंतर अवघ्या २४ तासांच्या आतच व्हिडीओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाला अधिकच गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीबाबतही काही दावे समोर आले आहेत. संबंधित व्यक्तीवर कुरार पोलीस ठाणे येथे खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एका जबाबदार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अशा प्रकारच्या व्यक्तीची उपस्थिती आणि त्यासंदर्भातील आरोपांमुळे नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसकडून हकालपट्टीची मागणी
काँग्रेसकडून या मुद्द्यावर सरकारला थेट घेरण्यात आले आहे. “राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे उदाहरण आहे,” असे पुन्हा एकदा ठामपणे सांगत सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाविलंब कारवाई करावी, अशी मागणी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Congress state president Harshvardhan Sapkal ) यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra politics) नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा कलंकित मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा,” अशा शब्दांत सपकाळ यांनी सरकारवर (government) जोरदार टीका केली.
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, हा प्रकार केवळ एका व्हिडीओपुरता मर्यादित नसून, सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ चौकशी (Immediate Inquiry) करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्या घटनेनंतरपासूनच झिरवाळ विरोधकांच्या निशाण्यावर होते. आता या नव्या व्हिडीओ प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसून येत आहे.
(नवाकाळ या आक्षेपार्ह व्हिडीओची पुष्टी करत नाही. )
झिरवाळ ‘Silent Mode’ मध्ये?
या संपूर्ण वादावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे समोर आले.त्यामुळे या प्रकरणाबाबत झिरवाळ यांची भूमिका अद्याप अस्पष्टच आहे.
‘जुना व्हिडीओ, नवा वाद’ : मिटकरींचा राजकीय कटाचा आरोप
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओ प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय कट (Political Conspiracy) असल्याचा गंभीर आरोप केला आहे.मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत अनेक प्रश्न उपस्थित केले.
मिटकरी म्हणाले की, भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवळ साहेबांचा व्हीडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला?राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब! त्यानंतर त्यांच्या ऑफिस मध्ये ACB चा ट्रॅप लावणे व नंतर आता हा व्हीडीओ सात महिन्यापूर्वी काढून मिडियाला सोपवणे!! एका सरळ माणसाला बदनाम करायचं नंतर मीडिया ट्रायल..हे झारीतील शुक्राचार्य कोण??अशोक खरात प्रकरण अंगलट येतय म्हणुंन स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतय ! #सोमवती अमावस्या ते अघोरी पुजा ह्या मागे २ सप्टेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६
भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवळ साहेबांचा व्हीडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला?राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही…
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 26, 2026
५० हजारांची लाच घेताना क्लर्कला अटक; झिरवाळ अडचणीत
नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने एका कामासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ‘एसीबी’ने त्याला रंगेहात पकडले.
एका औषध विक्रेत्याचा निलंबित झालेला परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र ढेरंगे असे या अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव असून, या कारवाईमुळे संबंधित शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात गटबाजी? नेतृत्वावरून संघर्ष तीव्र
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर नेतृत्व आणि मंत्रिपदांवरून पक्षात मोठी गटबाजी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवाळ यांची भूमिका विशेष ठळक ठरली होती. झिरवाळ यांनीच सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी सार्वजनिकरित्या केली होती. त्यामुळे पक्षातील सत्तासंतुलनावर त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जात होते. याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलीनीकरण करण्याबाबतही सकारात्मक वातावरण असल्याचा दावा झिरवाळ यांनी यापूर्वी केला होता. या भूमिकेमुळे पक्षातील काही गट नाराज असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळातील त्यांच्या स्थानावर डोळा असलेल्या काही अंतर्गत विरोधकांनीच झिरवाळ यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे झिरवाळ यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या वादांना आंतरिक राजकारणाचा (Internal Power Struggle) रंग मिळत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच, या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि नेतृत्वाच्या स्पर्धेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आगामी काळात पक्षातील समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार गटातील राजीनाम्यांची मालिका; आता झिरवाळांची टर्न?
राज्यात सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त घडामोडींमध्ये अजित पवार गटातील मंत्र्यांवर सातत्याने दबाव वाढताना दिसत आहे. अशातच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्याही राजीनाम्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या प्रकरणामुळे त्यांच्यावर नैतिकतेच्या आधारावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील उदाहरणे: दबाव वाढला की राजीनामा?
याआधीही अशाच प्रकारच्या वादांमुळे अजित पवार गटातील काही मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
महाराष्ट्राचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी कथित संबंधांमुळे आणि विरोधकांच्या दबावामुळे ४ मार्च २०२५ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आरोप नाकारले असले तरी “नैतिकतेच्या आधारावर” हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना १९९५ मधील सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या निर्णयानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. न्यायालयाने त्यांना दंडही ठोठावला होता, ज्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती.
याचदरम्यान, अंकशास्त्राच्या नावाखाली वादात सापडलेल्या अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला . या प्रकरणात समोर आलेल्या छायाचित्रांमुळे त्यांच्यावर मोठा दबाव निर्माण झाला होता.
जर या व्हिडीओ प्रकरणात आणखी गंभीर बाबी समोर आल्या किंवा राजकीय दबाव वाढला, तर झिरवाळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे झाल्यास, अलीकडील वादांनंतर झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील तिसरे मंत्री ठरू शकतात, ज्यांना वादामुळे पद सोडावे लागले. यामुळे आता सर्वांचे लक्ष या प्रकरणातील पुढील घडामोडींवर केंद्रित झाले आहे.
हे देखील वाचा –
बांगलादेशात बस पद्मा नदीत कोसळली ! २३ जणांचा मृत्यू
स्मार्टफोन झाला खूपच स्वस्त; लाँचनंतर पहिल्यांदाच किंमतीत मोठी कपात; किंमत एकदा पाहाच











