Luthra Brothers : गोव्यातील (Goa) हडफडे (Hadphade) येथील नाईट क्लब अग्निकांड प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा (Luthra Brothers) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी १ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली असून, त्यादिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणात न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुनावणी पुढे ढकलली. सरकारी वकील जेनिफर सांतामारीया यांनी सुनावणीदरम्यान संशयितांच्या जामिनाला जोरदार विरोध करत आपला युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख निश्चित केली. याआधी लुथरा बंधूंचा जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १२ फेब्रुवारी रोजी फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला. या नव्या अर्जावर ११ मार्च रोजी प्रथम सुनावणी झाली होती. सुनावणीवेळी दोन्ही आरोपी न्यायालयात उपस्थित होते.
दरम्यान, हडफडे येथील क्लब अग्निकांड प्रकरणात हणजूण पोलीस यांनी एकूण १४ संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यापैकी ११ जणांना अटक करण्यात आली होती. भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हे नोंदवून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
६ डिसेंबरच्या रात्री गोव्यातील अरपोरा येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये ही विनाशकारी आग लागली होती. या आगीत ५ पर्यटकांसह एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी दिल्लीत असलेले क्लबचे मालक असलेले लूथरा बंधू तत्काळ थायलंडला पळून गेले होते. त्यानंतर त्यांना थायलंडमधून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना भारतात आणले होते.
हडफडे येथील या अग्नितांडवामुळे मोठे नुकसान झाले होते आणि या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली होती. आता १ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, न्यायालयाच्या निर्णयावर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.











