UBT : मागील काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात ’ऑपरेशन टायगर’ची अर्थात उबाठाचे खासदार फुटणार अशी जोरदार चर्चा होती. एकीकडे संजय राऊतांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर काही खासदार हे उध्दव व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बोलले. यामुळे आदित्य ठाकरे संतापले. दुसरीकडे संजय राऊत यांनी राज्यसभेची सीट शरद पवारांना दिली जाईल असे वातावरण निर्माण केल्याने काही खासदार संजय राऊतवर भडकले आहेत. यातच संजय राऊत यांची मुदत संपल्यानंतर ते पुन्हा खासदार होणार नाहीत असे आदित्य ठाकरेंनी जाहीर केल्याने वातावरण कलुषित झाले आहे. आगामी काळात यातून फोडाफोड होण्याची शक्यता आहे.
उबाठा खासदारांच्या मनात नेमके काय चालले आहे याची चाचपणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या रविवारी मातोश्रीवर आपल्या खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत जे घडले त्याची माहिती आता चव्हाट्यावर आली आहे. पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी हातची गेल्याने संतप्त झालेल्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बैठकीत पक्षप्रमुखांसमोर आक्रमक भूमिका घेत संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली. आय वॉन्ट टू प्रोटेस्ट असे म्हणत राज्यसभेच्या जागेसाठी राऊत यांनी वारंवार शरद पवार यांचे नाव का घेतले, असा संतप्त सवाल चतुर्वेदी यांनी पक्षप्रमुखांना विचारला. त्यानंतर रागातच त्या बैठकीतून निघून गेल्या. तर दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या उबाठा खासदारांच्या बैठकीवरून नाराज असलेले आदित्य ठाकरे राऊतांवर चांगलेच संतापले. 2028 ला राऊत राज्यसभेत नसतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला, अशी चर्चा आहे. आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील-आष्टीकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार संजय देशमुख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत उबाठाचे दोन गट पडले होते. आदित्य ठाकरेंचा एक गट आणि संजय राऊत यांचा एक गट असे चित्र दिसले. बैठकीत एका खासदाराने प्रियंका चतुर्वेदी यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला.चतुर्वेदी यांना पक्षाने 6 वर्षे संधी देऊन पक्षाला त्याचा नेमका काय फायदा झाला, असा सवाल या खासदाराने केला. यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला घेत राऊत काही बोलले म्हणून काय झाले, पक्षप्रमुख मी आहे, अंतिम निर्णय माझाच असेल, असे सांगत त्या खासदाराला चुचकारण्याचा प्रयत्न केला.
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना भावनिक आवाहनही केले. ‘भाजपा आणि राष्ट्रवादीचे लोक मला म्हणतात की, तुमचे खासदार फुटणार. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही लढाई मी तुमच्याच जीवावर लढत आहे. तुम्हाला तसे वाटत नसेल तर मला स्पष्ट सांगा, मी थांबतो’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि उबाठात झालेल्या चर्चेचाही उलगडा बैठकीत झाला. उध्दव ठाकरे म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांनी ही जागा काँग्रेसला देण्याची विनंती माझ्याकडे केली होती. मात्र, तुम्ही याबाबत थेट शरद पवारांशी बोला. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही उपयोग होणार नाही, असे आपण काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले.
खरे तर राज्यसभेतील रिक्त पदांसाठी निवडणुकांची चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच या मुद्यावर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या भूमिका परस्पर विरोधी आहेत हे या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट दिसत होते. राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू होताच सर्वप्रथम महाविकास आघाडीकडून संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव पुढे केले. शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत.
त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा स्वतः बोलून दाखवली आहे. त्यामुळे मविआतून शरद पवार यांच्या नावावर एकमत होईल, असे राऊत म्हणाले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे यांना या जागेबद्दल विचारले असता, ही जागा आमच्या (उबाठा) हक्काची आहे. ती आम्हालाच मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे, अशी परस्पर विरोधी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. तेव्हाच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. मात्र आदित्य ठाकरे यांच्याशी थेट पंगा घेणे शक्य नसल्याने दुसऱ्या दिवसापासून राऊत यांनी काहीशी नरमाईची परंतु शरद पवार यांच्याच बाजूने झुकणारी भूमिका घेण्यास सुरुवात केली. राज्यसभेची जागा ही उबाठाचीच आहे. परंतु शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे मविआतील घटक पक्षांचे प्रमुख नेते एकत्रितपणे याबाबतचा निर्णय घेऊ, असे राऊत म्हणू लागले होते. पुढे मविआने या जागेसाठी शरद पवार यांचेच नाव पुढे केले. तेव्हापासून आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यावर नाराज होते.
यादरम्यान, संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उबाठाच्या खासदारांची एक बैठक झाली. या बैठकीत काही खासदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या बाहेर पडले पाहिजे, महाराष्ट्रभर दौरे केले पाहिजेत, त्याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणार नाही, असा नाराजीचा सूर काही खासदारांनी लावला. तर काहींनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीचा विचार करून त्यांच्या हिंडण्या-फिरण्याना मर्यादा आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी तरी महाराष्ट्रात फिरले पाहिजे, असे मत मांडले.
दिल्लीत झालेल्या या बैठकीत कोण काय बोलले हे आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज होते. संपूर्ण बैठकीत ते काहीही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर खासदारांबद्दल राग स्पष्ट दिसत होता, असे सुत्रांनी सांगितले.
संजय राऊत यांचे कानावर हात
यासंदर्भात संजय राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता राऊत यांनी मी त्या बैठकीला हजर नव्हतो, असे म्हणत कानावर हात ठेवले. त्यावेळी आमच्या पक्षात कसलीही नाराजी नाही. तुम्ही म्हणता तसे काही बैठकीत झाले असेल असे मला वाटत नाही, असेही राऊत म्हणाले.











