Home / क्रीडा / Indian Football Controversy: कोचीमध्ये भारतीय फुटबॉल संघाचा अपमान! या कारणामुळे प्रशिक्षक आणि खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला

Indian Football Controversy: कोचीमध्ये भारतीय फुटबॉल संघाचा अपमान! या कारणामुळे प्रशिक्षक आणि खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला

Indian Football Controversy: भारतीय फुटबॉलमध्ये मैदानातील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. हाँगकाँगविरुद्धच्या महत्त्वाच्या एएफसी आशियाई चषक (AFC...

By: Team Navakal
Indian Football Controversy
Social + WhatsApp CTA

Indian Football Controversy: भारतीय फुटबॉलमध्ये मैदानातील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. हाँगकाँगविरुद्धच्या महत्त्वाच्या एएफसी आशियाई चषक (AFC Asian Cup) पात्रता सामन्यापूर्वी कोचीमध्ये एक अत्यंत लाजीरवाणी घटना घडली आहे.

थकबाकी आणि पैशांच्या वादावरून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील आणि काही प्रमुख खेळाडूंना जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या प्रकारामुळे भारतीय फुटबॉल प्रशासनाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

भारतीय संघ हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी नियोजित पत्रकार परिषदेसाठी स्टेडियमवर पोहोचला होता. सुमारे 10 वर्षांनंतर भारतीय राष्ट्रीय संघ कोचीमध्ये खेळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह होता. मात्र, प्रशिक्षक खालिद जमील यांच्यासह आशिक कुरुनियन, सहल अब्दुल समद आणि बिजोय वर्गीस स्टेडियमच्या गेटवर पोहोचले असता, तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला.

पैशांचे गणित आणि वादाचे मूळ

ग्रेटर कोचीन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (GCDA) मालकीच्या या स्टेडियममध्ये प्रवेशासाठी सुमारे 20 ते 25 लाख रुपयांची सुरक्षा ठेव (Security Deposit) आणि 3 लाख रुपये भाडे थकीत असल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम भरल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. दुसरीकडे, केरळ फुटबॉल असोसिएशनने (KFA) हा तांत्रिक प्रश्न असल्याचे सांगत वेळ मागून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रशासनाचा दावा आणि जुना इतिहास

या गोंधळानंतर केरळ फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नवास मीरान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “हा एक छोटा तांत्रिक मुद्दा असून तो लवकरच सोडवला जाईल. 31 मार्च रोजी होणारा हाँगकाँगविरुद्धचा सामना ठरल्याप्रमाणेच पार पडेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, याच स्टेडियमवर फेब्रुवारी महिन्यात ‘केरळ ब्लास्टर्स’ या आयएसएल क्लबलाही अशाच प्रकारच्या पैशांच्या वादामुळे प्रवेश नाकारण्यात आला होता.

वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे स्टेडियमची मालकी असलेल्या GCDA आणि सामने आयोजित करणाऱ्या KFA यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रीय संघाच्या खेळाडूंना अशा प्रकारे रस्त्यावर उभे राहण्याची वेळ येणे, हे भारतीय फुटबॉलसाठी भूषणावह नसल्याची टीका आता क्रीडाप्रेमींमधून होत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या