Home / देश-विदेश / Lockdown Rumors: भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? सरकारने स्पष्ट केली भूमिका

Lockdown Rumors: भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? सरकारने स्पष्ट केली भूमिका

Lockdown Rumors: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा एकदा ‘कोविड’ काळाप्रमाणे देशव्यापी लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते....

By: Team Navakal
Lockdown Rumors
Social + WhatsApp CTA

Lockdown Rumors: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा एकदा ‘कोविड’ काळाप्रमाणे देशव्यापी लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व बातम्या धादांत खोट्या असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले आहे. केंद्र सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

अफवांचे पेव आणि सरकारचे स्पष्टीकरण

मध्यपूर्वेतील युद्धामुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ हा ऊर्जा मार्ग बंद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि पेट्रोल पंपांवरील गर्दी वाढल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

यावर हरदीप पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, “देशात लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी संयम राखून जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.”

भारताची ऊर्जा स्थिती सुरक्षित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. नागरिकांसाठी इंधन, ऊर्जा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे. भारताने जागतिक अनिश्चिततेच्या काळात नेहमीच लवचिकता दाखवली असून, भविष्यातही हीच स्थिती कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांचे संसदेत आश्वासन

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पश्चिम आशियातील युद्धावर भाष्य केले होते. भारताने गेल्या 11 वर्षांत 53 लाख मेट्रिक टन तेलाचा साठा (स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह) तयार केला आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. भविष्यात आणखी 65 लाख मेट्रिक टन क्षमतेचा राखीव साठा निर्माण केला जाणार आहे. उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतांकडून गॅस आणि कच्च्या तेलाची खरेदी करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

थोडक्यात, देशात इंधनाचा साठा पुरेसा असून लॉकडाऊनचा कोणताही विचार सरकार करत नाही. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन व्यवहारांत घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या