Central Railway Recruitment : मध्य रेल्वे प्रशासनाने 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत संगणक-आधारित चाचणी परीक्षेचे माध्यम केवळ हिंदी आणि इंग्रजी ठेवले आहे. यावरून मनसे आता आक्रमक झाली आहे. मराठी भाषेला जाणीवपूर्वक वगळण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी केला असून, त्यांनी एक्स पोस्ट करत मध्य रेल्वेचा निषेध केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्याची मागणी करत मनसेने जोरदार आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 15 ते 20 दिवसांत मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रोखण्याचा इशाराही देण्यात आला.
याबाबत अमित ठाकरे म्हणाले की, 2008 साली राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांनी रेल्वे भरती प्रक्रियेत मराठी भाषा व भूमिपुत्रांचा हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता.त्या आंदोलनानंतर 2017, 2019 आणि अगदी 2023 पर्यंत रेल्वेच्या परीक्षा मराठीत घेण्यात येत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासन मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहत आहे? ऑगस्ट 2025 मध्ये रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत परीक्षा 15 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आश्वासन दिले होते. मग हा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केला आहे का? महाराष्ट्राच्या भूमीत नोकरी करायची आणि भरती प्रक्रियेत मराठीचा विचार करायचा नाही, ही कसली दडपशाही? अधिसूचनेत तातडीने बदल करून मराठी भाषेचा समावेश करावा. अन्यथा मराठी कामगारांच्या हक्कांसाठी मनसे मैदानात उतरेल. याविरोधानंतर ही अधिसूचना रद्द केली असून, या भरतीसाठी नवी अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे, असे मध्य रेल्वेने एका पत्रकाद्वारे सांगितले.










