Iran-Israel War: पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान एका आगळ्यावेगळ्या घटनेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर ‘थँक यू इंडिया’ असे संदेश लिहिल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील इराणचे महावाणिज्य दूतावास आणि इराणच्या सरकारी माध्यमांनी याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. इराणच्या एरोस्पेस फोर्सच्या जवानांनी निळ्या मार्करने ही कृतज्ञता व्यक्त केली आहे.
नेमका प्रकार काय?
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4’ अंतर्गत इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मोठा मारा केला. या मोहिमेदरम्यान इराणने केवळ भारताचेच नाही, तर स्पेन, पाकिस्तान आणि जर्मनीच्या जनतेचेही आभार मानले आहेत. इराणच्या मते, हे ते देश आहेत ज्यांनी या संकटकाळात तेहरानबद्दल सहानुभूती दाखवली आहे. या हल्ल्यात इराणने अशदोद येथील तेल साठे आणि अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
भारताचे आभार मानण्यामागची प्रमुख कारणे
- होरमुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग: इराणने नुकतेच स्पष्ट केले होते की, अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांवर निर्बंध असले तरी भारतीय जहाजांना ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतून’ सुरक्षित प्रवासाची मुभा असेल. इराणने भारताचा उल्लेख ‘मित्र राष्ट्र’ म्हणून केला आहे.
- काश्मीरमधून मिळालेली मोठी मदत: जम्मू-काश्मीरमधील जनतेने इराणमधील युद्धग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत गोळा केली आहे. यामध्ये रोख रक्कम, दागिने आणि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. एका काश्मीरी महिलेने आपल्या दिवंगत पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ ३० वर्षांपासून जपून ठेवलेले सोन्याचे दागिने दान केल्याचे उदाहरण इराणमध्ये चर्चेत आहे.
- लहान मुलांचे ‘पिगी बँक’ दान: भारतीय मुलांनी त्यांचे साचवलेले पैसे (पिगी बँक) इराणमधील मिनाब शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दान केले आहेत. या शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय मुलांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेने इराण सरकार भारावून गेले आहे. “लहान पण प्रेमाने भरलेल्या हृदयांची ही भेट आम्ही कधीच विसरणार नाही,” असे इराणच्या दूतावासाने म्हटले आहे.
भारताची मुत्सद्दी भूमिका
एकीकडे भारतीय जनता मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करत असताना, दुसरीकडे भारत सरकारने अत्यंत समतोल भूमिका घेतली आहे. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धानंतर भारताने हिंसाचाराचा निषेध केला असून, संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांमुळे भारत या वादात अत्यंत सावधपणे पावले उचलत आहे.









