FBI Director Kash Patel email account hack Iran hackers : अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (FBI) प्रमुख काश पटेल यांना इराणशी संबंधित हॅकर्सनी लक्ष्य केले आहे. हॅकर्सनी पटेल यांचे वैयक्तिक ईमेल अकाउंट हॅक केल्याचा दावा केला असून, त्यातील काही खासगी फोटो आणि महत्त्वाची कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली असून, अमेरिकेच्या न्याय विभागानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
‘हंडाला’ हॅकर्सचा मोठा दावा
स्वतःला पॅलेस्टाईन समर्थक म्हणवणाऱ्या ‘हंडाला हॅक टीम’ने या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या गटाने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, “यशस्वीपणे हॅक करण्यात आलेल्या बळींच्या यादीत आता काश पटेल यांचेही नाव सामील झाले आहे.”
हॅकर्सनी पटेल यांच्या ईमेलमधील 2010 ते 2019 या कालावधीतील वैयक्तिक आणि कामाशी संबंधित पत्रव्यवहार उघड केला आहे. पश्चिम देशांतील तज्ज्ञांच्या मते, हा गट प्रत्यक्षात इराणच्या सरकारी सायबर इंटेलिजन्स युनिटचा एक भाग आहे.
काय कागदपत्रे झाली लीक?
लीक झालेल्या माहितीमध्ये एफबीआय संचालकांचे काही फोटो आणि संवेदनशील कागदपत्रांचा समावेश आहे. न्याय विभागाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आलेले साहित्य अधिकृत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. डार्क वेबवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थांच्या मते, हॅकर्सनी ज्या ईमेल पत्त्याचा वापर केला आहे, तो यापूर्वीही काही डेटा लीकमध्ये पटेल यांच्या नावाशी जोडला गेला होता.
हॅकर्सचा वाढता उपद्रव
याच हँडला गटाने 11 मार्च रोजी ‘स्ट्रायकर’ या वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपनीचा डेटा हॅक केल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना लक्ष्य करून तिथली माहिती चोरणे आणि ती सार्वजनिक करणे, हा या गटाचा मुख्य उद्देश असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, एफबीआयने अद्याप या प्रकरणावर अधिकृत भाष्य केलेले नाही.









