Home / देश-विदेश / KP Sharma Oli : सत्तापालटानंतर नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींना अटक

KP Sharma Oli : सत्तापालटानंतर नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींना अटक

KP Sharma Oli : नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर सत्तापरिवर्तन झाले असून, रॅपरमधून राजकारणी बनलेले ३५ वर्षीय बालेंद्र शाह (बालेन)...

By: Team Navakal
KP Sharma Oli
Social + WhatsApp CTA

KP Sharma Oli : नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर सत्तापरिवर्तन झाले असून, रॅपरमधून राजकारणी बनलेले ३५ वर्षीय बालेंद्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारीच पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या सरकारने गेल्या वर्षी झालेल्या ‘Gen Z’ (जेन जी) आंदोलनांच्या दडपशाही प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाचा अहवाल स्वीकारला. या अहवालातील शिफारशींनुसार, शनिवारी पहाटे नेपाळ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

अटक आणि तपासाची पार्श्वभूमी-
माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना भक्तपूर जिल्ह्यातील गुंडू येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच वेळी, माजी गृहमंत्री आणि नेपाळी काँग्रेसचे नेते रमेश लेखक यांना पहाटे ५ च्या सुमारास भक्तपूरमधील सूर्यविनायक परिसरातून अटक करण्यात आली. सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमध्ये तरुणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भ्रष्टाचारविरोधी ‘Gen Z’ आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या आंदोलनाच्या दडपशाहीसाठी तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचा ठपका चौकशी आयोगाने ठेवला आहे.

चौकशी आयोगाच्या शिफारशींची कठोर अंमलबजावणी: गृह मंत्रालयाच्या तक्रारीनंतर नेपाळमध्ये मोठे अटकसत्र-
नेपाळच्या गृह मंत्रालयाने नोंदवलेल्या अधिकृत तक्रारीनंतर आणि त्यानंतर जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटच्या आधारे शनिवारी पहाटे ही मोठी कारवाई करण्यात आली. ‘जीन झी’ (Gen Z) आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी करण्याचे संकेत नवनियुक्त पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारताच दिले होते. त्याप्रमाणे गृह मंत्रालयाने तातडीने सूत्रे हलवत या प्रकरणाचा कायदेशीर तपास सुरू केला आणि माजी पंतप्रधान व गृहमंत्र्यांविरुद्ध सबळ पुरावे सादर केले.

न्यायाधीश गौरी बहादूर कार्की आयोगाचा अहवाल-
‘काठमांडू पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष न्यायालयाचे माजी न्यायाधीश गौरी बहादूर कार्की यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने आंदोलनादरम्यान झालेल्या जीवितहानीचा आणि सरकारी यंत्रणांच्या भूमिकेचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर केला होता. या अहवालात तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि गृहमंत्री रमेश लेखक यांनी आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्याचे आदेश देऊन घटनात्मक मर्यादेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.

औपचारिक तक्रार आणि कायदेशीर प्रक्रिया-
गृह मंत्रालयाने आयोगाच्या शिफारशींनुसार एक औपचारिक फौजदारी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने या दिग्गज नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. शनिवारी पहाटे पोलिसांच्या विशेष पथकाने या वॉरंटची अंमलबजावणी करत दोघांनाही त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले.

१० वर्षांच्या कारावासाची टांगती तलवार: नेपाळच्या राष्ट्रीय दंड संहितेनुसार माजी पंतप्रधान व गृहमंत्र्यांवर गुन्हे दाखल-
नेपाळमधील सप्टेंबर २०२५ च्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. या अहवालात केवळ राजकीय जबाबदारीच नव्हे, तर ‘गुन्हेगारी निष्काळजीपणा’ (Criminal Negligence) सिद्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या शिफारशींच्या आधारे, नेपाळच्या गृह मंत्रालयाने आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

कलम १८१ आणि १८२ चा बडगा-
न्यायाधीश गौरी बहादूर कार्की यांच्या नेतृत्वाखालील समितीने दिलेल्या शिफारशीनुसार, माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, माजी गृहमंत्री रमेश लेखक आणि तत्कालीन पोलीस महानिरीक्षक (IGP) चंद्र कुबेर खापुंग यांच्यावर नेपाळच्या राष्ट्रीय दंड संहितेतील (National Penal Code) कलम १८१ आणि १८२ अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे कलम प्रामुख्याने कर्तव्य बजावताना दाखवलेला निष्काळजीपणा आणि त्यातून उद्भवलेला मनुष्यवध यांशी संबंधित आहे.तसेच या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

नेपाळमध्ये ‘बालेन’ युगाचा प्रारंभ: ३५ वर्षीय बालेंद्र शाह यांनी स्वीकारली पंतप्रधानपदाची धुरा-
नेपाळच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘शीतल निवास’ येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर बालेंद्र शाह यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ‘राष्ट्रिय स्वतंत्र पक्षा’चे (आरएसपी) नेते असलेल्या बालेंद्र शाह यांच्या रूपाने नेपाळला लोकशाही मार्गाने निवडून आलेले आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान मिळाले आहेत. विशेष म्हणजे, नेपाळच्या दक्षिण भागातील ‘मधेश प्रदेशा’तून देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत.

राजकीय उलथापालथ आणि सत्तेचे समीकरण-
गेल्या सहा महिन्यांपासून नेपाळमध्ये कमालीची राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये ‘जेन झी’ (Gen Z) या तरुण पिढीने भ्रष्टाचार आणि सरकारी अनास्थेविरोधात पुकारलेल्या हिंसक आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर देशाचा कारभार हंगामी सरकारद्वारे चालवला जात होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकांमध्ये बालेंद्र शाह यांच्या पक्षाने प्रस्थापित पक्षांना धूळ चारत अभूतपूर्व विजय मिळवला. तरुणाईचा मोठा पाठिंबा आणि बदलाची आस यांमुळे बालेंद्र शाह पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत.

अभियंता, रॅपर ते पंतप्रधान: एक अद्भूत प्रवास
बालेंद्र शाह यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पेशाने स्थापत्य अभियंता (Civil Engineer) असलेले बालेंद्र हे नेपाळमधील एक प्रसिद्ध रॅपर म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होते. संगीताच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विसंगतींवर नेहमीच बोट ठेवले. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येऊन सर्वांना चकित केले होते. महापौर असताना त्यांनी केलेल्या विकासकामांनी आणि प्रशासकीय पारदर्शकतेने त्यांची लोकप्रियता संपूर्ण देशात पसरली, ज्याची परिणती आज त्यांच्या पंतप्रधान होण्यात झाली आहे.

प्रस्थापित सत्ताधिशांना धक्का: बालेंद्र शाह यांचा ऐतिहासिक विजय आणि पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा-
नेपाळमध्ये ५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल अत्यंत विस्मयकारक लागले आहेत. ‘राष्ट्रिय स्वतंत्र पक्षा’चे (आरएसपी) तरुण नेते बालेंद्र शाह यांनी झापा-५ या मतदारसंघातून निवडणूक लढवत, नेपाळचे दिग्गज नेते के.पी. शर्मा ओली यांचा दारुण पराभव केला. चार वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेल्या ओली यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात झालेला हा पराभव नेपाळमधील बदलत्या राजकीय वाऱ्याचे प्रतीक मानला जात आहे.

‘आरएसपी’ची ऐतिहासिक लाट आणि प्रस्थापितांचे पतन-
या निवडणुकीत बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालील ‘आरएसपी’ने संपूर्ण देशात एक मोठी लाट निर्माण केली होती. नेपाळच्या संसदेतील एकूण २७५ जागांपैकी तब्बल १८२ जागांवर एकहाती विजय मिळवून ‘आरएसपी’ने सत्तास्थापनेचा मार्ग अत्यंत सुकर केला. या राजकीय वादळात नेपाळमधील अनेक दशकांपासून वर्चस्व असलेले पक्ष भुईसपाट झाले. नेपाळी काँग्रेसला अवघ्या ३८ जागांवर समाधान मानावे लागले, तर ओली यांच्या ‘सीपीएन-यूएमएल’ पक्षाला केवळ २५ जागा मिळाल्या. याशिवाय नेपाळी कम्युनिस्ट पार्टीला १७ जागांवरच मजल मारता आली. या निकालांमुळे नेपाळच्या राजकारणातील घराणेशाही आणि पारंपारिक सत्ताकेंद्रे पूर्णपणे कोलमडून पडली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बालेंद्र शाह यांचे अभिनंदन-
नेपाळमध्ये बालेंद्र शाह यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळताच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी उभय नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या