Rupali Chakankar and Ashok Kharat : नाशिक येथील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारस्थान उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी आता आपली भूमिका पूर्णपणे बदलली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खरात याच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, अशा भोंदूबाबांना ‘ठोकून काढले पाहिजे’, असे आक्रमक विधान केले आहे.
काही दिवसांपूर्वी जेव्हा या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले होते, तेव्हा भरणे यांनी त्यांची बाजू सावरून धरली होती. “एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुणी भेटले किंवा फोटो काढला, तर त्यात त्या व्यक्तीची काय चूक?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, आता प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता राजकीय दबाव लक्षात घेता, भरणे यांनी आपल्या जुन्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “जेव्हा मी सुरुवातीला प्रतिक्रिया दिली, तेव्हा मला अशोक खरात याच्या कृत्यांबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. तो एक भोंदूबाबा आहे हे नंतर समजले. आम्ही कोणत्याही प्रकारच्या बुवाबाजीच्या विरोधात आहोत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला नेहमीच तशी शिकवण दिली आहे.”
या प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आधीच आपल्या पदांचे राजीनामे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले आहेत. या पार्श्वभूमीवर भरणे पुढे म्हणाले की, “अशोक खरात हा अत्यंत विकृत प्रवृत्तीचा माणूस असून त्याने समाजाची फसवणूक केली आहे. अशा लोकांमुळे चांगल्या महाराजांची प्रतिमा मलिन होते. खरातला कठोर शिक्षा झालीच पाहिजे जेणेकरून भविष्यात कुणीही असे धाडस करणार नाही.” तसेच, राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका भरणे यांनी घेतली.









