Ashok Kharat : स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या आणि अध्यात्माच्या नावाखाली अघोरी कृत्ये करणाऱ्या अशोक खरात याच्या पापांचा घडा आता भरला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खरात हा मोठ्या प्रमाणावर ‘हवाला रॅकेट’ चालवत असून, बेकायदेशीर मार्गाने परदेशात अफाट पैसा पाठवत असल्याचे सबळ पुरावे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत.
दुबई कनेक्शन आणि आर्थिक गैरव्यवहार-
SIT ने केलेल्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, खरातचे आर्थिक धागेदोरे थेट दुबईपर्यंत विस्तारलेले आहेत. भारतातून दुबईला आणि तेथून पुन्हा भारतात कोट्यवधी रुपयांची अवैध देवाणघेवाण खरातच्या माध्यमातून होत होती. या काळ्या धंद्यासाठी त्याने काही खासगी एजंट्सची साखळी निर्माण केली होती. तपास यंत्रणांना खरातच्या काही डायऱ्या, डिजिटल पुरावे आणि संशयास्पद बँक व्यवहारांचे तपशील मिळाले आहेत. या व्यवहारांमध्ये परकीय चलन विनिमय कायद्याचे (FEMA) उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत असून, या प्रकरणाची व्याप्ती पाहता लवकरच सक्तवसुली संचालनालय (ED) या तपासात हस्तक्षेप करण्याची दाट शक्यता आहे.
राजकीय वरदहस्त आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कवच-
इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार सुरू असतानाही खरात आजवर कायद्याच्या कचाट्यातून वाचत होता, त्यामागे त्याला मिळालेले ‘कवच’ कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काही वजनदार राजकीय नेते, त्याचे बडे भक्त आणि काही भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळेच खरातचे हे साम्राज्य राजरोसपणे फोफावले होते. या प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने तो आपले काळे धंदे सुरक्षितपणे चालवत होता. आता SIT या ‘बड्या धेंडांच्या’ नावांची यादी तयार करत असून, लवकरच त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे आहेत.
तक्रारदारांचा ओघ वाढला; ७० टक्के महिला बळी-
खरातच्या अटकेनंतर पीडितांमध्ये हळूहळू विश्वास निर्माण होत आहे. SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक जणांनी संपर्क साधला असून, धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये ७० टक्के तक्रारदार या महिला आहेत. मात्र, सामाजिक बदनामी आणि खरातच्या दहशतीमुळे अनेक महिला लेखी तक्रार देण्यास अद्याप धजावत नसल्याचे चित्र आहे.









