Ashadhi Wari 2026: सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकरी संप्रदायासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. आळंदी देवस्थानच्या वतीने आयोजित बैठकीत यंदाच्या वारीच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, वारकरी आता ‘विठू’ नामाच्या जयघोषात पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी सज्ज झाले आहेत.
यंदाचा प्रस्थान सोहळा कधी?
यंदा माउलींच्या पालखीचे प्रस्थान ८ जुलै (बुधवार) रोजी दुपारी ३ वाजता आळंदीतून होणार आहे. १७ दिवसांच्या पायी प्रवासानंतर हा सोहळा २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल. विशेष म्हणजे, यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
रिंगण सोहळ्यांचे विशेष आकर्षण
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या भक्तीचा परमोच्च बिंदू असलेले रिंगण सोहळे खालीलप्रमाणे पार पडतील:
- ३ उभे रिंगण: चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि वाखरी (दुपारी).
- ४ गोल रिंगण: पुरंदवडे, खडूस फाटा, ठाकूरबुवा समाधी आणि बाजीराव विहीर.
माउलींच्या पालखीचा सविस्तर मार्ग (प्रमुख मुक्काम):
- ८ जुलै: आळंदी येथून प्रस्थान.
- ९ व १० जुलै: पुणे मुक्काम.
- ११ व १२ जुलै: सासवड मुक्काम.
- १३ जुलै: जेजुरी (खंडोबा नगरीत मुक्काम).
- १४ जुलै: वाल्हे.
- १५ जुलै: नीरा स्नान करून लोणंद येथे मुक्काम.
- १६ जुलै: चांदोबाचा लिंब (पहिले उभे रिंगण) व तरडगाव मुक्काम.
- १७ जुलै: फलटण.
- १८ जुलै: बरड.
- १९ जुलै: नातेपुते.
- २० जुलै: पुरंदवडे (पहिले गोल रिंगण) व माळशिरस मुक्काम.
- २१ जुलै: खडूस फाटा (दुसरे गोल रिंगण) व वेळापूर मुक्काम.
- २२ जुलै: ठाकूरबुवा समाधी (तिसरे गोल रिंगण), बंधू भेट व भंडीशेगाव मुक्काम.
- २३ जुलै: बाजीराव विहीर (गोल व उभे रिंगण) व वाखरी मुक्काम.
- २४ जुलै: वाखरी (दुपारी उभे रिंगण) व पंढरपूरमध्ये आगमन.
ऊन-पावसाची पर्वा न करता लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. आळंदी संस्थानचे सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी या बैठकीत वारीतील विविध समस्यांबाबत शासन स्तरावर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. आता अवघ्या वारकरी विश्वाला वेध लागले आहेत ते आषाढीच्या वारीचे!










