Financial Rules Change: नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक आर्थिक आणि नियामक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. आयकर, बँकिंग, इंधन आणि प्रवासाशी संबंधित हे १० बदल प्रत्येक नागरिकाने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
१. नवीन आयकर कायदा लागू होणार
वर्ष १९६१ चा जुना आयकर कायदा आता इतिहास जमा होणार असून ‘आयकर कायदा २०२५’ त्याची जागा घेईल. यामध्ये ‘असेसमेंट इयर’ आणि ‘प्रिव्हिअस इयर’ सारख्या गुंतागुंतीच्या संज्ञा काढून टाकून आता फक्त ‘टॅक्स इयर’ ही एकच संज्ञा वापरली जाईल.
२. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर
नवीन कर रचनेअंतर्गत (New Tax Regime) सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कलम ८७ ए अंतर्गत वाढीव सवलतीमुळे आता वर्षाला १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही.
३. टीडीएस फॉर्ममध्ये बदल
१ एप्रिलपासून फॉर्म १६ आणि फॉर्म १६ ए ऐवजी आता अनुक्रमे ‘फॉर्म १३०’ आणि ‘फॉर्म १३१’ वापरले जातील. यामुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि स्पष्ट होणार आहे.
४. पॅन कार्डसाठी नियम कडक
आता पॅन कार्ड अर्जासाठी केवळ आधार कार्ड हे जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. त्यासाठी आता १० वीचे प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
५. एलपीजी सिलिंडरचे दर बदलणार
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे १ एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या दरातील या बदलाचा थेट परिणाम किचनच्या बजेटवर होऊ शकतो.
६. सीएनजी, पीएनजी आणि विमान प्रवास महागणार?
नैसर्गिक वायू (CNG, PNG) आणि विमानाचे इंधन (ATF) यांच्या दरांचे पुनरावलोकन केले जाईल. यामुळे शहरांतर्गत प्रवास आणि विमान तिकीट दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
७. एटीएममधून पैसे काढणे महागणार
एचडीएफसी बँक आता ‘युपीआय एटीएम’ व्यवहारांचा समावेश मोफत मर्यादेत करणार आहे. ५ पेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रत्येक वेळी २३ रुपये शुल्क आकारले जाईल. बंधन बँकेनेही मेट्रो शहरात ३ आणि इतर शहरात ५ मोफत व्यवहारांची मर्यादा ठेवली असून, त्यानंतर २३ रुपये आणि अपुऱ्या शिलकीमुळे व्यवहार रद्द झाल्यास २५ रुपये दंड आकारला जाईल.
८. पैसे काढण्याच्या मर्यादेत कपात
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या काही निवडक डेबिट कार्ड्सवरून पैसे काढण्याची मर्यादा ५०,००० ते ७५,००० रुपयांपर्यंत खाली आणली आहे. पूर्वी ही मर्यादा १,००,००० रुपये होती.
९. रेल्वे तिकीट रद्द करण्याचे नियम कडक
रेल्वे प्रवाशांसाठी आता तिकीट रद्द करणे महाग पडणार आहे. गाडी सुटण्याच्या ८ तास आधी तिकीट रद्द केल्यास आता कोणताही परतावा (Refund) मिळणार नाही. पूर्वी ही मर्यादा ४ तासांची होती.
१०. रेल्वे रिफंडचे नवे स्वरूप
- ७२ तासांपेक्षा जास्त वेळ असताना रद्द केल्यास: रेल्वेच्या अटींनुसार किमान कॅन्सेलेशन चार्ज कापून उर्वरित रक्कम मिळेल.
- ८ ते २४ तास आधी तिकीट रद्द केल्यास: ५०% परतावा मिळेल.
- २४ ते ७२ तास आधी रद्द केल्यास: २५% रक्कम कपात केली जाईल.










