Kidney Health Guide: मानवी शरीराचे आरोग्य हे बऱ्याच अंशी रक्ताच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि हे शुद्धीकरणाचे काम आपले दोन्ही मूत्रपिंड म्हणजेच किडनी अहोरात्र करत असतात. रक्तातील अनावश्यक घटक गाळून ते बाहेर काढणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे आणि हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक घटकांची निर्मिती करणे, अशी बहुविध कामे किडनी पार पाडते.
दुर्दैवाने, आपल्या जिभेचे चोचले पुरवताना आपण अशा काही गोष्टींचे सेवन करतो, ज्या किडनीसाठी ‘गुप्त शत्रू’ ठरतात. या पदार्थांमुळे किडनीच्या गाळण प्रक्रियेवर प्रचंड ताण येतो आणि हळूहळू तिची कार्यक्षमता संपत जाते. वेळीच काळजी न घेतल्यास डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटसारखी गंभीर वेळ येऊ शकते.
किडनीला इजा पोहोचवणारे ५ प्रमुख घटक:
1. मैदा आणि पांढरे पदार्थ (Refined Carbs): पांढरे ब्रेड, पास्ता, पिझ्झा आणि मैद्याचे इतर पदार्थ शरीरातील इन्सुलिनची पातळी अचानक वाढवतात. यामध्ये फायबर नसल्यामुळे ते पचायला जड असतात आणि शरीरात जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर विपरित परिणाम होतो.
2. हवाबंद आणि पाकिटबंद पदार्थ : बाहेरून विकत आणलेले तयार सूप, सॉस किंवा फ्रोजन भाज्या दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यात मिठाचा (सोडियम) प्रचंड वापर केलेला असतो. अति मीठ थेट रक्तदाब वाढवते, जो किडनी निकामी होण्याचे प्रमुख कारण मानला जातो.
3. प्रक्रिया केलेले मांस (Processed Meat): बॅाक्समध्ये मिळणारे मांस किंवा सॉसेजमध्ये नायट्रेट्स आणि सोडियमचे प्रमाण अधिक असते. यातील अतिरिक्त प्रोटीन पचवताना किडनीला अधिक मेहनत करावी लागते, ज्यामुळे तिचा नैसर्गिक समतोल बिघडतो.
4. शीतपेये आणि सोड्याचे अतिसेवन: कोल्ड ड्रिंक्स किंवा सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण अफाट असते. त्याशिवाय यात फॉस्फरस नावाचे रसायन असते, जे शरीरातील कॅल्शिअम कमी करते. यामुळे किडनीमध्ये खडे (Stone) होण्याची शक्यता बळावते.
5. अतिरिक्त साखर आणि कृत्रिम स्वीटनर: साखरेचा अतिवापर लठ्ठपणा आणि मधुमेहाकडे नेतो. मधुमेह हा किडनीचा सर्वात मोठा शत्रू आहे. डाएट ड्रिंक्समध्ये वापरले जाणारे कृत्रिम गोड पदार्थ देखील किडनीच्या पेशींना इजा पोहोचवू शकतात.
आपल्या किडनीचे आरोग्य आपल्याच हातात आहे. आहारात मिठाचे आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवणे, भरपूर पाणी पिणे आणि ताजी फळे-भाज्यांचे सेवन करणे हाच किडनी दीर्घकाळ निरोगी ठेवण्याचा सोपा मार्ग आहे.










