Mohit Kamboj : व्यावसायिक व भाजपा नेते मोहित कंबोज यांची कन्या मिशका कंबोज हिच्या 16व्या वाढदिवसानिमित्त काल मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला राजकीय नेते आणि सिनेसृष्टी रांगा लावून हजर होती. कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला अंबानी पासून शाहरूखपर्यंत सर्व आलेले पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राजकीय दिग्गजांसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली. रणवीर सिंह, संजय दत्त आणि शाहरुख खान यांची उपस्थिती विशेष ठरली. रणवीर सिंहने चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर स्टेजवर परफॉर्मही केले. संजय दत्त त्याला उत्स्फूर्त साथ देत होता. अनंत अंबानी आणि पत्नी राधिका मर्चंट यांनीही हजेरी लावली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अमृता अरोरा आणि मान्यता दत्तही उपस्थित होत्या.

मोहित कंबोज मुंबईत आले तेव्हा त्यांची अतिसामान्य आर्थिक परिस्थिती होती. त्यानंतर राजकीय पटलावर त्यांचा वेगाने उदय झाला. हिरे व्यापारी संघटनेचे ते अध्यक्ष बनले. सिंचन व जलसंधारण विभागात त्यांच्या सहमतीशिवाय निविदा निघत नाहीत, अशी त्यांच्याबद्दल कायम चर्चा होती. ही चर्चा वाढत गेली आणि पुढे एक दिवस त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. सर्वांना याचे आश्चर्य वाटत असतानाच त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचेही जाहीर केले आहे.













