Women’s Health Tips: धावपळीच्या जीवनशैलीत महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः वयाची 30 ओलांडल्यानंतर शरीरातील कॅल्शिअमची पातळी खालावल्याने हाडे कमकुवत होण्याची प्रक्रिया सुरू होते.
सुरुवातीला ही कमतरता साधी वाटत असली तरी, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास त्याचे रूपांतर ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर आजारात होऊ शकते. म्हणूनच, शरीरात कॅल्शिअम कमी झाल्यावर नेमके कोणते बदल दिसतात आणि ते कसे रोखावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कॅल्शिअमच्या कमतरतेचा सामना कसा करावा?
- विटामिन-डी चे महत्त्व: केवळ कॅल्शिअम घेऊन चालत नाही, तर ते शोषण्यासाठी शरीराला विटामिन-डी ची गरज असते. यासाठी रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे फायदेशीर ठरते.
- दुग्धजन्य पदार्थांचा वापर: दूध, दही, पनीर आणि ताक हे कॅल्शिअमचे नैसर्गिक आणि सर्वोत्तम स्त्रोत आहेत. आहारात यांचा नियमित समावेश ठेवा.
- पालेभाज्या आणि नट्स: आहारात पालक, मेथी आणि ब्रोकोली सोबतच बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि पांढऱ्या तिळाचा वापर वाढवा. एका चमचा तिळातून भरपूर कॅल्शिअम मिळते.
- आहार नियंत्रण: चहा, कॉफी आणि मिठाचे अतिसेवन टाळा, कारण या गोष्टी शरीरातील कॅल्शिअम कमी करण्यास कारणीभूत ठरतात.
कॅल्शिअम कमी झाल्याचे 5 धोक्याचे संकेत:
त्वचा आणि नखांचे आरोग्य: कॅल्शिअम अभावी नखे पातळ होऊन सहज तुटतात, तसेच त्वचा कमालीची कोरडी पडते आणि तिला खाज सुटू शकते.
हाडांचा ठिसूळपणा: थोडासा धक्का लागला तरी फ्रॅक्चर होणे किंवा पाठ आणि मान सतत दुखणे हे कॅल्शिअमच्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे.
स्नायूंमध्ये ओढ लागणे: चालताना किंवा हालचाल करताना मांड्या, हात आणि पायांच्या स्नायूंमध्ये वारंवार पेटके येणे किंवा वेदना होणे.
दातांचे विकार: शरीरातील बहुतांश कॅल्शिअम दात आणि हाडांमध्ये असते. याची पातळी कमी झाली की दात कमकुवत होऊन लवकर सडू लागतात.
सतत येणारा थकवा: पुरेशी विश्रांती घेऊनही जर तुम्हाला सतत गळून गेल्यासारखे वाटत असेल किंवा चक्कर येत असेल, तर ते हाडे ठिसूळ झाल्याचे लक्षण असू शकते.











