Home / महाराष्ट्र / Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण; “खरातला भेटायला वेळ, पण चौकशीला नाही?”; संगीता तिवारी यांचा रूपाली चाकणकरांवर बोचरा वार

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण; “खरातला भेटायला वेळ, पण चौकशीला नाही?”; संगीता तिवारी यांचा रूपाली चाकणकरांवर बोचरा वार

Rupali Chakankar : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र पडसाद उमटू...

By: Team Navakal
Rupali Chakankar
Social + WhatsApp CTA

Rupali Chakankar : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर राहण्यास टाळाटाळ केल्याची माहिती समोर आली आहे. आज त्यांची या प्रकरणी सखोल चौकशी होण्याची शक्यता होती, मात्र त्यांनी वैयक्तिक कारणास्तव या प्रक्रियेपासून लांब राहणे पसंत केल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

चौकशी टाळण्यासाठी दिलेले कारण वादाच्या भोवऱ्यात-
अधिकच्या माहितीनुसार, रूपाली चाकणकर यांनी तपास यंत्रणेला कळवले आहे की, ‘महिला असल्यामुळे त्यांना प्रवास करण्यास असमर्थता’ वाटत आहे. त्यांच्या या विधानावरून आता वादाला तोंड फुटले असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दमानिया यांनी हा दावा खोडून काढताना असे म्हटले आहे की, चाकणकर यांनी दिलेले कारण अत्यंत विक्षिप्त, क्षुल्लक आणि जबाबदारी झटकणारे आहे. तपास यंत्रणेला सहकार्य करण्याऐवजी अशा प्रकारची कारणे देऊन वेळ मारून नेणे हे संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुण्यात ‘गुलाबो गँग’चे संतापजनक आंदोलन-
या प्रकरणातील संथ गती आणि चाकणकर यांची भूमिका याविरोधात पुण्यातील ‘गुलाबो गँग’ ही महिला संघटना आता रस्त्यावर उतरली आहे. संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी भोंदू अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत पुण्यात आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी अशोक खरातची प्रतिकात्मक ‘तिरडी’ काढून त्याचे अंत्यसंस्कार केल्याचा देखावा केला. शिवाय या महिलांनी केवळ निषेधच नोंदवला नाही, तर रूपाली चाकणकर यांना अटक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी देखील केली आहे.

“खरातला भेटायला वेळ, पण चौकशीला नाही?-संगीता तिवारी
भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांच्या तपासात आता राजकीय ठिणग्या पडू लागल्या आहेत. विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर राहण्यास रूपाली चाकणकर यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर, पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे महिला काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षा संगीता तिवारी यांनी ‘गुलाबो गँग’च्या माध्यमातून अत्यंत आक्रमक पवित्रा घेत चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

विसंगत भूमिकेवर कडक टीका-
माध्यमांशी संवाद साधताना संगीता तिवारी यांनी रूपाली चाकणकर यांच्या प्रकृतीचे किंवा प्रवासाचे कारण देऊन चौकशी टाळण्याच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की, चाकणकर यांनी ‘प्रवासाची अडचण’ असल्याचे सांगून चौकशीला दांडी मारली आहे, त्यावर तिवारी यांनी अत्यंत उपरोधिकपणे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “जर रूपाली चाकणकर या भोंदू अशोक खरातला भेटण्यासाठी जाऊ शकतात, तर मग त्यांना पोलीस चौकशीसाठी हजर राहण्यात नेमकी काय अडचण येत आहे? खरातच्या भेटीला जाण्यासाठी त्यांना प्रवास नडत नाही.

सह-आरोपी करण्याची मागणी-
केवळ टीका करून न थांबता, संगीता तिवारी यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’कडे एक मोठी मागणी केली आहे. अशोक खरात याच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये किंवा त्याला अभय देण्यात चाकणकर यांची काही भूमिका आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “रूपाली चाकणकर यांना या प्रकरणात सह-आरोपी करा असं देखील तिवारी म्हणाल्या.

अशोक खरात प्रकरण: “पदराने पाय पुसताना त्रास झाला नाही, मग चौकशीला का?”; अंजली दमानिया यांचा रूपाली चाकणकरांवर बोचरा प्रहार-
रूपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर राहण्यास नकार दिल्यानंतर, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील त्यांच्यावर शब्दांच्या फैरी झाडल्या आहेत. चाकणकर यांनी चौकशी टाळण्यासाठी दिलेले कारण अत्यंत ‘हास्यास्पद’ आणि ‘विक्षिप्त’ असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

कारणांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह-
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना रूपाली चाकणकर यांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या, “एसआयटीने बजावलेल्या समन्सला उत्तर देताना चाकणकर यांनी आपण ‘महिला’ असल्याचे आणि ‘प्रवासाचा त्रास’ होत असल्याचे कारण पुढे केले आहे. हे ऐकून धक्का बसतो. ज्या स्त्रीने सार्वजनिक जीवनात इतकी वर्षे घालवली, त्यांना अचानक तपासासाठी प्रवास करताना अडचण कशी काय येऊ शकते? हे केवळ वेळ मारून नेण्याचे आणि कायद्यापासून पळ काढण्याचे एक क्षुल्लक साधन आहे.”

जुन्या चित्रफितींचा दिला संदर्भ-
दमानिया यांनी खरात आणि चाकणकर यांच्यातील जवळीक स्पष्ट करण्यासाठी काही जुन्या प्रसंगांची आठवण करून दिली. त्या पुढे म्हणाल्या की, “रूपाली चाकणकर यांना अशोक खरातच्या दरबारात जाताना अनेकदा पाहिले आहे. त्यांच्या भाषणांच्या चित्रफिती (Videos) समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर, खरातचे पदराने पाय पुसतानाचे आणि त्याच्यासोबत केक खातानाचे त्यांचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यावेळी त्यांना प्रवासाचा कोणताही त्रास झाला नाही किंवा महिला असण्याचा अडथळा जाणवला नाही; मग आता पोलीस चौकशीला सामोरे जातानाच ही कारणे का आठवत आहेत?” अशोक खरातने शेकडो महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप असताना, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांनी अशा प्रकारे तपासाला सहकार्य न करणे हे अत्यंत संतापजनक असल्याचे दमानिया यांनी नमूद केले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या