Naseem Shah Fine: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपला स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह याच्यावर शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे. एका राजकीय नेत्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केल्याबद्दल नसीम शाहला सुमारे 72,000 डॉलर्स म्हणजेच 2 कोटी पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या उद्घाटन सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे हा वाद निर्माण झाला.
नेमके प्रकरण काय?
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पीएसएलचा पहिला सामना खेळवला गेला. या कार्यक्रमाला पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांना निमंत्रित करण्यात आले होते. नवाज यांची उपस्थिती पाहून नसीम शाहने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने विचारले होते की, “तिला लॉर्ड्सवरील राणीसारखी वागणूक का दिली जात आहे?” नसीमने ही पोस्ट काही वेळातच डिलीट केली आणि नंतर आपले अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला. मात्र, तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले होते.
पीसीबीची कठोर भूमिका
नसीम शाहने आपल्या केंद्रीय करारातील अटींचे आणि मीडिया धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका बोर्डाने ठेवला आहे. लाहोर येथे तीन सदस्यीय शिस्तपालन समितीसमोर नसीम हजर झाला होता.
पीसीबीने स्पष्ट केले की, नसीमने आपल्या सोशल मीडिया सल्लागाराला कामावरून काढून टाकले आहे आणि बोर्डाने देखील अशा सल्लागारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. नसीमने या प्रकरणाबद्दल बिनशर्त माफी देखील मागितली आहे.
प्रेक्षकांविना रंगतोय पीएसएल
इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या पाकिस्तानात सुरक्षेच्या कारणास्तव पीएसएलचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जात आहेत. सुरुवातीला सहा शहरांमध्ये होणारी ही स्पर्धा आता केवळ लाहोर आणि कराचीमध्ये मर्यादित करण्यात आली आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे सरकारकडून नागरिकांना घरून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नसीम शाह सध्या रावळपिंडी पिंडीझ या नवीन फ्रँचायझीकडून खेळत आहे. पहिल्या सामन्यात त्याने 51 धावा दिल्या, मात्र त्याला एकही बळी मिळवता आला नाही. नसीमने आतापर्यंत पाकिस्तानसाठी 20 कसोटी, 34 एकदिवसीय आणि 37 टी20 सामन्यांमध्ये एकूण 152 बळी घेतले आहेत. यापूर्वी आमिर जमाल या खेळाडूलाही अशाच प्रकारच्या राजकीय संदर्भातील पोस्टमुळे दंड सोसावा लागला होता.










