Oracle Layoffs : जागतिक आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरेकलने आपल्या कर्मचारी वर्गात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, याचा सर्वाधिक फटका भारतीय कर्मचाऱ्यांना बसला आहे. बुधवारी पहाटे 5 ते 6 च्या सुमारास अनेक कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे त्यांच्या नोकऱ्या गेल्याची माहिती देण्यात आली. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि मानवी संसाधन विभागाशी चर्चा न करता थेट ईमेल आल्याने कर्मचारी हादरले आहेत.
भारतात मोठी कपात
मिळालेल्या माहितीनुसार, ओरेकलने आपल्या एकूण 30,000 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 12,000 जणांना नारळ दिला आहे. जागतिक स्तरावर ही कपात एकूण कर्मचारी संख्येच्या 18 टक्के म्हणजेच साधारण 30,000 च्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. संगणकीय व्यवसाय क्षेत्रातील विभागांना याचा मोठा फटका बसला असून, भारत आणि मेक्सिकोमधील कर्मचाऱ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. सोशल मीडियावर अनेक कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली असून, 20-20 वर्षे काम करणाऱ्यांनाही एका क्षणात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अचानक झाली कारवाई
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ईमेल मिळाल्यानंतर काही वेळातच त्यांचे अंतर्गत सिस्टिम एक्सेस आणि कंपनीचे आयडी बंद करण्यात आले. कंपनीने आपल्या अंतर्गत संदेशात म्हटले आहे की, कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी संघटनात्मक बदल केले जात असून, त्यामुळे काही पदे रद्द करण्यात आली आहेत. पुढील एक महिन्यात कपातीची दुसरी फेरी देखील येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
काय मिळणार भरपाई?
ओरेकलने बाधित कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. यामध्ये:
- प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी 15 दिवसांचा पगार.
- एक महिन्याचा नोटीस पिरियड पगार.
- रजेचे पैसे आणि पात्रतेनुसार ग्रॅच्युइटी.
- दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार. मात्र, हे पॅकेज केवळ अशाच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे स्वतःहून राजीनामा देण्यास तयार होतील.
एआयमधील गुंतवणूक वाढवण्यासाठी पाऊल?
तज्ज्ञांच्या मते, ओरेकल सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सेंटर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. या नवीन तंत्रज्ञानासाठी निधी उपलब्ध व्हावा आणि खर्च कमी व्हावा, या उद्देशाने ही कर्मचारी कपात केली जात असावी. यापूर्वी ॲमेझॉनसारख्या कंपन्यांनीही एआय क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी अशीच पावले उचलली होती. सध्या ओरेकलने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र आयटी क्षेत्रात या निर्णयामुळे चिंतेचे वातावरण आहे.










