Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार पहाटे सकाळी 6 वाजताच्या सुमारास देशाला संबोधून भाषण केले. यावेळी त्यांनी इराणविरुद्धचे युध्द सुरूच राहील हे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने आज सकाळी शेअर बाजार धडाधड कोसळला.
पुढील दोन आठवडे इराणवर जबरदस्त हल्ले केले जातील असे ट्रम्प यांनी जाहीर केले. आता तेल व नैसर्गिक वायू आपण व व्हेनेझुएला उत्पादन व वितरणात अव्वल असून आपल्याकडून तेल विकत घ्यावे असे आवाहन ट्रम्प यांनी केले. इराणला अणु सक्षम बनू देणार नाही याचा पुनरुच्चार करीत त्यांनी मित्रदेशांना होर्मुज सामुद्रधुनी काबीज करण्याचे आवाहन केले. डोनाल्ड ट्रम्प आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात म्हणाले की, ‘एपिक फ्युरी’ सुरू करून एक महिना झाला आहे. जगातील दहशतवादाला पोसणार्या इराणच्या विरोधात हे आक्रमण होते. गेले चार आठवडे आपण अभूतपूर्व यश मिळविले आहे. त्यांचे नेते ठार झाले, त्यांचे लष्कर उद्ध्वस्त झाले, त्यांची क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता न्यूनतम स्तरावर आली आहे. त्यांच्या रॉकेट लॉन्चरचे आपण तुकडे करीत आहोत. गेल्या 5 वर्षात माझ्या नेतृत्त्वाखालील अमेरिकेचा सतत विजय होत आहे. व्हेनेझुएलाही आपण काही मिनिटांत काबीज केले. आपली लष्करी ताकद आता परमोच्च बिंदुला पोहोचली आहे. व्हेनेझुएलाशी आपण करार करून नैसर्गिक वायू आणि तेलाचे उत्पादन व विक्री फार मोठ्या प्रमाणात करीत आहोत. अमेरिकेनंतर सर्वाधिक साठा तिथे आहे. आता आपल्याला तेल व वायूसाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. इराणच्या तेलाची व वायूची आपल्याला आवश्यकता नाही. आपण तिथे असण्याचीच गरज नाही पण आपण मित्रराष्ट्रांच्या मदतीसाठी तिथे आहोत.
इराणला अणुशस्त्र उत्पादन करू देणार नाही असे मी 2015 साली सांगितले होते. आपल्याला आणि इस्त्रायलला इराण सतत त्रास देत आहे. आपल्या तळांवर, आपल्या जवानांवर त्यांनी हल्ला केला. त्यांनी आंदोलन करणार्या स्वत:च्या 45 हजार लोकांना ठार केले. 47 वर्षे त्यांचे हल्ले सुरू आहेत. हे आधीच थांबायला हवे होते, बराक ओबामाने त्यांना अब्जावधीची रोकड मदत म्हणून दिली, पण ते सुधारले नाहीत, ते आपला आपल्या राष्ट्राध्यक्षांना हसले. आपले राष्ट्राध्यक्ष चुका करीत राहिले. मी त्या चुका सुधारतो आहे. इराणच्या अणु प्रकल्पांवर मी हल्ला करण्याचा निर्णय घेतला, ते अणुबॉम्ब बनविणार होते, आपण आपल्या या शत्रुला नेस्तनाबूत केले आहे. या ध्येयासाठी जे 13 अमेरिकी जवान शहीद झाले त्यांचा सन्मान करतो. या सर्वांच्या कुटुंबांनी मला विनंती केली की आपली मोहीम फत्ते करा. गॅसचे भाव वाढले आहेत, पण हे तात्पुरते आहे. इराणच्या बॉम्बपासून आपण मुक्त होत आहे. आपला देश मरतुकडा, अपंग झाला होता. आता आपण कणखर झालो आहोत. आपल्याकडे रशिया आणि सौदी मिळून जितके तेल व गॅसचे उत्पादन करतात तितके आपल्याकडे आहे. ज्यांना तेल व गॅससाठी होर्मुज अवलंबून राहावे लागत आहे. त्या देशांनी होर्मुजवर कब्जा घ्यावा, मी या देशांना आवाहन करतो की अमेरिकेकडून तेल आणि वायू विकत घ्या. आपल्याकडे त्याचा भरपूर साठा आहे. आता पुढील दोन ते तीन आठवड्यात आपण इराणवर असा जबरदस्त हल्ला करणार आहोत की, इराण पुन्हा अनेक शतके मागे जाईल. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, इराक युद्ध हे सर्व काही वर्षे चालले. या युद्धाला तर फक्त 32 दिवस झाले आहेत. आपण ते युध्य जिंकू तेव्हा आपण सर्वात बलवान असू. ट्रम्प यांच्या या भाषणावर जगभरातून टीका होत आहे. ट्रम्प दरवेळी त्याच मुद्यावर बोलतात, त्यांना माघार घ्यायची आहे पण सन्मान राहील असा मार्ग सापडत नाही अशी बोचरी टीका सुरू झाली.
आम्ही कधी युद्ध सुरू केले नाही! स्वतःचा बचाव केला
अमेरिकन नागरिकांना इराण राष्ट्राध्यक्षांचे खुले पत्र
तेहरान – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्र संबोधून भाषण केल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी अमेरिकन नागरिकांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, इराणला धोकादायक देश म्हणून दाखवले जाणे चुकीचे आहे. इराण हा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असून त्यांनी कधीही स्वतःहून युद्ध सुरू केले नाही. इराणने फक्त स्वतःवर हल्ला झाल्यावरच बचावात्मक कारवाई केली आहे. इराणच्या लोकांना अमेरिकन किंवा इतर देशांच्या लोकांबद्दल कोणताही द्वेष नाही. पण अमेरिकेच्या धोरणांमुळे, परकीय हस्तक्षेप आणि कडक निर्बंधांमुळे इराणमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे.
मसूद पेजेश्कियन यांनी अमेरिकेवर आरोप केला की, इराणला धोका म्हणून दाखवणे हे राजकीय आणि आर्थिक कारणांसाठी केले जाते. तसेच इराणभोवती मोठ्या प्रमाणावर अमेरिकन सैन्य तैनात असल्यामुळे तणाव वाढत आहे. इराणने संवाद आणि कराराचा मार्ग स्वीकारला होता, पण अमेरिकेनेच त्यातून माघार घेतली. युद्ध आणि निर्बंधांमुळे सामान्य लोकांचे मोठे नुकसान होत आहे. इराण आणि अमेरिकेचे संबंध सुरुवातीला वैरपूर्ण नव्हते. मात्र, इराणच्या संसाधनांच्या राष्ट्रीयीकरणाला रोखण्यासाठी झालेल्या हस्तक्षेपाने परिस्थिती बदलली. त्या घटनेमुळे लोकशाही प्रक्रियेला धक्का बसला. हुकूमशाही पुन्हा प्रस्थापित झाली आणि अमेरिकेच्या धोरणांबद्दल इराणी जनतेत अविश्वास निर्माण झाला. पुढे शासनाला दिलेला पाठिंबा, 1980 च्या युद्धात सद्दाम हुसेनला दिलेली मदत, दीर्घकालीन निर्बंध आणि चर्चेदरम्यान केलेले लष्करी हल्ले-यामुळे हा अविश्वास अधिक वाढला. या सर्व दबावांनंतरही इराण अधिक सक्षम झाला आहे. साक्षरतेचे प्रमाण 30% वरून 90% पेक्षा जास्त झाले आहे; उच्च शिक्षणात मोठी वाढ झाली आहे; आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. तथापि, निर्बंध, युद्ध आणि हल्ल्यांचा इराणी जनतेवर झालेला अमानवी परिणाम दुर्लक्षित करता येणार नाही. युद्धामुळे जीवन, घरे आणि भविष्य उद्ध्वस्त झाल्यास लोक जबाबदार व्यक्तींविषयी उदासीन राहू शकत नाहीत. यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो: या युद्धातून नेमके अमेरिकन जनतेचे कोणते हित साधले जात आहे? निरपराध मुलांची हत्या, कॅन्सर उपचार केंद्रांचे नुकसान किंवा एखाद्या देशाला पाषाणयुगात परत पाठवण्याच्या धमक्या यातून अमेरिकेची प्रतिमा सुधारते का? इराणने संवादाचा मार्ग स्वीकारला, करार केले आणि आपली बांधिलकी पूर्ण केली. मात्र, त्या करारातून बाहेर पडण्याचा आणि संघर्ष वाढवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करणे म्हणजे थेट जनतेवर हल्ला करणे होय. हे केवळ युद्ध गुन्हा नसून, त्याचे परिणाम सीमांच्या पलीकडे जातात. अस्थिरता, आर्थिक व मानवी नुकसान वाढते आणि दीर्घकालीन तणाव निर्माण होतो. अमेरिका इस्रायलच्या प्रभावाखाली या संघर्षात उतरली आहे का? इस्रायल इराणचा धोका दाखवून पॅलेस्टिनी मुद्यावरून लक्ष हटवत आहे का? हे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आज जग एका निर्णायक वळणावर उभे आहे. संघर्षाचा मार्ग अधिक खर्चिक आणि निष्फळ ठरत आहे. संवाद आणि सहकार्याचा मार्ग निवडणे अत्यावश्यक आहे. इतिहासात अनेक आक्रमक नष्ट झाले, पण इराण टिकून राहिला-सशक्त, सन्माननीय आणि अभिमानाने उभा आहे, असे म्हटले आहे.










