Ashok Kharat Case: नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील बलात्काराच्या आरोपांनी महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरात याचे काही बड्या नेत्यांसोबतचे कॉल रेकॉर्ड्स (CDR) जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कडक भूमिका घेतली आहे.
सीडीआर (CDR) लीक प्रकरणाची चौकशी होणार
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अशोक खरातला कोणी आणि किती वेळा फोन केले, याची यादीच वाचून दाखवली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सीडीआर मिळवण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणांना असतो. हा डेटा लीक कसा झाला आणि तो कोणापर्यंत पोहोचला, याची राज्य सरकार सखोल चौकशी करणार आहे. केवळ कोणाशी बोललो यावर गुन्हेगारी न्यायव्यवस्था चालत नाही, तर सबळ पुराव्यांच्या आधारावर कारवाई केली जाईल.”
अंजली दमानिया यांचे खळबळजनक आरोप
दमानिया यांनी आपल्या दाव्यात अनेक दिग्गजांची नावे घेतली आहेत. त्यांच्या आरोपानुसार:
- रुपाली चाकणकर: खरातला 177 कॉल्स केले असून, त्यांच्या बहिणीचे 236 कॉल्स आहेत. चाकणकर या खरातशी तब्बल 33,727 सेकंद बोलल्याचा दावा त्यांनी केला.
- एकनाथ शिंदे: उपमुख्यमंत्र्यांचे 17 कॉल्स असून त्यातील एका संभाषणाची वेळ 21 मिनिटे असल्याचे त्यांनी सांगितले.
- इतर नेते: चंद्रकांत पाटील (8 कॉल्स), सुनील तटकरे (8 कॉल्स) आणि आशिष शेलार (1 कॉल) यांचीही नावे त्यांनी घेतली आहेत.
तपासाची सद्यस्थिती
अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले असून एसआयटी (SIT) या प्रकरणाचा तपास करत आहे. दररोज नवनवीन माहिती समोर येत असून, पीडितांच्या तक्रारींनंतर खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. “एसआयटी आपला तपास योग्य पद्धतीने करत असून योग्य वेळी सर्व माहिती समोर येईल,” असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, सीडीआर लीक प्रकरणाच्या चौकशीत काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – Who is Akash More: कोण आहेत आकाश मोरे? बारामतीत सुनेत्रा पवारांना काँग्रेसचे आव्हान; अजितदादांच्या निधनानंतर होणार पोटनिवडणूक











