Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि ‘झापूक झुपूक’ फेम सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण सध्या एका सुखद कारणाने चर्चेत आला आहे. सूरज आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संजनाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेल्या काही छायाचित्रांमुळे सूरज लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे.
संजनाची सूचक पोस्ट आणि ‘बेबी बंप’ची चर्चा-
संजनाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर साझा केला आहे, ज्यामध्ये तिचा ‘बेबी बंप’ स्पष्टपणे दिसून येत आहे. हे छायाचित्र शेअर करताना तिने पार्श्वभूमीला अलका कुबल यांच्या ‘देवकी’ या गाजलेल्या चित्रपटातील एक हृदयस्पर्शी गाणे जोडले आहे. इतकेच नव्हे, तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लाल हृदय (Red Heart), ‘इविल आय’ (Blue Eye) आणि गरोदर महिलेची इमोजी वापरली आहे. विशेष म्हणजे, या पोस्टवरील लोकांच्या प्रतिक्रिया टाळण्यासाठी तिने कमेंट सेक्शन बंद ठेवले आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
गुढीपाडव्याचे फोटोशूट आणि भावनिक ऑडिओ-
यापूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संजनाने एक विशेष फोटोशूट केले होते. त्यातील एका व्हिडिओमध्ये तिने अत्यंत भावूक ऑडिओचा वापर केला होता. “तू अजून माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते… आता फक्त तुझी वाट बघते,” अशा आशयाचा तो संदेश होता. संजनाच्या या सातत्यपूर्ण सूचक पोस्ट्समुळे चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात लग्नाच्या चारच महिन्यांत ही ‘गुड न्यूज’ आल्याने आश्चर्य आणि आनंद व्यक्त होत आहे.
चाहत्यांमध्ये संभ्रम आणि अधिकृत घोषणेची प्रतीक्षा-
सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा असली, तरी काही नेटकऱ्यांनी हे फोटो ‘एआय’ (AI) जनरेटेड तर नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित केली आहे. तसेच, सूरज चव्हाणने अद्याप या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.










