Dharashiv ZP two hours TV and mobile ban : स्मार्टफोन आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणारा परिणाम रोखण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात आता दररोज संध्याकाळी ठराविक वेळी ‘डिजिटल डिटॉक्स’ पाळला जाणार असून, या काळात संपूर्ण गावात टीव्ही आणि मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे ही नवीन योजना?
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व 760 ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
- वेळ: दररोज संध्याकाळी 7 ते 9 ही दोन तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
- भोंगा यंत्रणा: अभ्यासाची वेळ झाली हे सूचित करण्यासाठी गावात भोंगा वाजवला जाईल. हा भोंगा म्हणजे पालकांसाठी टीव्ही बंद करण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी पुस्तके हातात घेण्याची वर्दी असेल.
- देखरेख: हा निर्णय केवळ कागदावर राहू नये, यासाठी प्रत्येक गावाला एक अधिकारी दत्तक दिला जाणार आहे. शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे पथक गावात गस्त घालून या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची खातरजमा करतील.
शिक्षण सुधारण्यासाठी अधिक पावले
केवळ टीव्ही बंद करून न थांबता, मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी इतरही घोषणा केल्या आहेत:
- सेमी इंग्लिश: जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा एकदा सेमी इंग्लिश पॅटर्न प्रभावीपणे राबवला जाईल.
- वाचन मोहीम: विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विशेष वाचन मोहीम हाती घेतली जाणार आहे.
पालकांना भावनिक आवाहन
“मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी दिवसातील केवळ दोन तास टीव्हीचा त्याग करावा,” असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी केवळ प्रशासन नाही, तर संपूर्ण समाजाचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शैक्षणिक वर्तुळातून या निर्णयाचे मोठे स्वागत होत असले तरी, घराघरातील टीव्ही बंद करण्याच्या या ‘सक्ती’ला धाराशिवकर प्रत्यक्षात किती प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.











