Ashok Kharat Case Nashik : नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे एकामागून एक पदर आता उलगडू लागले आहेत. खरातच्या अटकेनंतर नाशिक पोलिसांनी पीडितांसाठी सुरू केलेल्या विशेष हेल्पलाईनवर तक्रारींचा अक्षरशः ओघ सुरू झाला आहे. केवळ आर्थिक लूटच नव्हे, तर ‘अध्यात्म आणि ऊर्जे’च्या नावाखाली महिलांचे अमानुष लैंगिक शोषण केल्याचे अत्यंत घृणास्पद वास्तव आता चव्हाट्यावर आले आहे. याप्रकरणी आणखी ११ पीडित महिलांनी धैर्याने पुढे येत खरातवर अत्याचाराचे गंभीर आरोप केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भीती आणि दहशतीचे जाळे: कुटुंबाच्या नावाखाली मानसिक छळ-
अशोक खरात हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांच्या धार्मिक भावनांचा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा गैरफायदा घेत असे. “तुझ्या पतीचा किंवा मुलाचा अकाली मृत्यू होईल,” अशी भीती घालून तो महिलांचे मानसिक खच्चीकरण करायचा. त्यानंतर ही ‘पीडा’ टळण्यासाठी ‘शरीरशांती’ आणि ‘विशेष पूजे’चा बनाव रचून तो महिलांचे शारीरिक शोषण करत असे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक पीडितांनी आपली वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्ता देखील खरातने दहशतीखाली बळकावल्याची आपबिती पोलिसांना सांगितली आहे.
एसआयटीची आक्रमक कारवाई आणि सायबर ‘क्लीनअप’-
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेले विशेष तपास पथक (SIT) अत्यंत वेगाने काम करत आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत खरातविरुद्ध एकूण १२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, ज्यात ८ गुन्हे महिला अत्याचाराचे तर ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. सायबर विभागाने खरातशी संबंधित तब्बल ४,६५० अश्लील लिंक इंटरनेटवरून हटवल्या असून, त्याचे ४५० सोशल मीडिया अकाऊंट्स कायमचे बंद केले आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता, खरातच्या अवैध मालमत्तेची कागदपत्रे आता अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) सोपवण्यात आली आहेत.
न्यायालयीन कोठडी आणि पुढील दिशा-
खरातची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील अधिक धागेदोरे शोधण्यासाठी आणि बळकावलेली मालमत्ता पुनर्प्राप्त करण्यासाठी पोलीस त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. खरातवर येत्या ६० दिवसांत दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल करण्याचे उद्दिष्ट पोलिसांनी ठेवले असून, आतापर्यंत ३० महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
सामाजिक आवाहन आणि सतर्कता-
अशोक खरातच्या अटकेनंतर अनेक पीडित नागरिक आता भीती झुगारून समोर येत आहेत. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही भोंदूगिरीला बळी पडू नका आणि जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.










